नारळीपौर्णिमेचा उत्साह शिगेला
By Admin | Updated: August 28, 2015 23:17 IST2015-08-28T23:17:09+5:302015-08-28T23:17:09+5:30
सरकारने मासेमारीच्या तारखा दिल्या तरी पंरपराप्रिय कोळी समाजाने पारंपारीक नारळी पोर्णिमेचा मुहूर्त निवडला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, आणि झाई या गावांमध्ये

नारळीपौर्णिमेचा उत्साह शिगेला
बोर्डी : सरकारने मासेमारीच्या तारखा दिल्या तरी पंरपराप्रिय कोळी समाजाने पारंपारीक नारळी पोर्णिमेचा मुहूर्त निवडला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, आणि झाई या गावांमध्ये या निमित्ताने झावळ्याच्या कमानी तर कुठे रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या आहेत. मासेमारीकरीता ‘गोल्डन बेल्ट’ समजला जाणाऱ्या या भागातील मासेमार बांधवांनी शनिवारच्या कार्यक्रमाची जंगी तयारी केल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी २९ आॅगस्ट रोजी नारळीपौर्णिमा हा सण असून कोळी बांधवाकडून तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी होडीची पुजा करून दर्यासागराला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यावेळी पारंपारीक कोळीगीतावर नाच केला जातो. माशांच्या रूपाने दाण पदरात टाक आणि खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या धन्याचे रक्षण करण्याची मागणी मागण्यासाठी किनारपट्टीवर सर्व कोळीबांधव एकत्र येऊन पुजा करतात. हा सोहळा पाहण्याकरीता बोर्डी पर्यटनस्थळी परगावातील पर्यटकांसह स्थानिक नागरीक जमा होतात.
येथील सागरी पट्ट्यात किनाऱ्यालगत उथळ पाण्यात आणि २२ सागरी मैलादरम्यान मासेमारी केली जाते. २ कि. मी. अंतरापर्यंत लहान होड्यांचे कचवे आदीच्या सहाय्याने बोंबिल, शिंगाळी, काठी, शिवंड, कोळंबी, मुशी तर २२ सागरी मैलादरम्यान, डोल, दादला पद्धतीच्या मासेमारीकरीता विविध प्रकारच्या जाळीचा वापर करून रावस, घोळ, दाढा, कोता, वाय या माशांची मासेमारी पारंपारीक पद्धतीने केली जाते. अशी माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. (वार्ताहर)