नाखवा निघाले म्हावरं ‘लुटायला’
By Admin | Updated: August 29, 2015 22:07 IST2015-08-29T22:07:46+5:302015-08-29T22:07:46+5:30
आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला

नाखवा निघाले म्हावरं ‘लुटायला’
वसई : आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला मानाचा नारळ देऊन प्रार्थना करण्यात येते. या वेळी महिलांनी आपल्या पारंपारिक पोषाखात माझा धनी सुखी राहुदे आणि माझे सौभाग्य अखंड राहो, व्यवसायातून समृद्धी लागो अशी आळवणी केली.
दरवर्षी पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर पश्चिम किनारपट्टीवरील गावातील मच्छीमार नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची विधीवत पूजा केल्यानंतर आपल्या मासेमारी व्यवसायास सुरूवात करीत असतात. मात्र यंदा अधिक मास असल्यामुळे नारळी पौर्णिमा १५ ते १६ दिवस उशीराने आली. बंदीचा काळ संपल्यानंतर मासेमारीला यापूर्वीच सुरूवात झाली होती. परंतु मच्छीमार समाजामध्ये समुद्रपुजनाला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे ही पूजा कधीही टाळली जात नाही. यंदाही ही पूजा विधीवत पार पडली. यावेळी अनेक मच्छीमार महिला पारंपारीक पेहराव करून समुद्र पूजनाला आल्या होत्या. (प्रतिनिधी)
गेल्या काही वर्षापासून या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. या व्यवसायाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन, घटते समुद्रधन, वाढता इंधनाचा खर्च व साहित्याच्या दरात झालेली वाढ अशा नानाविध अडचणीमुळे मासेमारी व्यवसाय सध्या उतरणीला लागला आहे. अशाही परिस्थितीमध्ये भार्इंदर, उत्तन, वसई, कळंब, अर्नाळा, चिंचणी, डहाणू या समुद्रकिनारी असलेल्या गावामधील हजारो कुटुंबे या व्यवसायामध्ये रोजगार मिळवून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. गावागावातील मच्छीमार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मासेमारी व्यवसायातही सहकार तत्वावर मासे खरेदी-विक्री होत असते.