एमएमआरडीएविरोधात आंदोलनास्त्र
By Admin | Updated: April 14, 2017 03:05 IST2017-04-14T03:05:37+5:302017-04-14T03:05:37+5:30
एमएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्याला वसईसह रायगड जिल्ह्यातून जोरदार विरोध सुरु झाला आहे. जनतेचा विकास आराखडा मंचाने आराखड्याविरोधात

एमएमआरडीएविरोधात आंदोलनास्त्र
वसई : एमएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्याला वसईसह रायगड जिल्ह्यातून जोरदार विरोध सुरु झाला आहे. जनतेचा विकास आराखडा मंचाने आराखड्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर वसई पर्यावरण संवर्धन समितीने आराखडा मराठी प्रसिद्ध करून हरकती नोंदवण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
बिल्डरांच्या सोयीसाठी मुंबईचे नाव वापरून महामुंबई करण्यासाठी एमएमआरडीएने प्रारुप आराखडा तयार केला आहे. मात्र, शेतकऱ्यांना काय हवे आहे याचा विचार न करता आराखडा लादायचा प्रयत्न केला असल्याने त्याविरोधात आता जनता उठाव केल्याशिवाय राहणार नाही, असे जनतेचा विकास आराखडा मंचाचे मनवेल तुस्कानो सांगितले. मंचाच्यावतीने वसईसह रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेण्यात येत आहेत. त्यात आता रस्त्यावर उतरूनच विरोध करावा लागेल, असे आवाहन केले जात आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये चंद्रशेखर प्रभू, मनवेल तुस्कानो, उल्का महाजन, अॅड. सुरेखा दळवी, शैलेद्र कांबळे, मिलन म्हात्रे, आमदार धैर्यशिल पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार विवेक पाटील, भूषण पाटील, मुक्ता श्रीवास्तव, पायस मच्याडो, पॅट्रीक फर्नांडीस यांनी मार्गदर्शन केले.
हा आराखडा मुठभर श्रीमंतांच्या आणि बिल्डरांच्या सोयीसाठी बनवला असून हरित पट्ट्यात एफएसआय वाढ, औद्योगिक वसाहती, सेंट्रल कॉरिडोर, लोकांचे विभाजन आणि अनेक जुलमी नियोजने करण्यात आल्याची माहिती सभांमध्ये दिली गेली. (प्रतिनिधी)
आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणी
प्रारुप आराखडा मराठीत प्रसिद्ध करून हरकती मागवण्याची मुदत वाढवण्यात यावी, अन्यथा कोर्टात दाद मागितली जाईल, असा इशारा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी राज्य सरकारला दिला आहे. एमएमआरडीएच्या हद्दीत येणाऱ्या सात महापालिकांसाठी आराखडा जाहिर केल्यानंतर २७ मार्चपर्यंत हरकती मागवण्यात आल्या.
आराखडा इंग्रजीत असल्याने त्यावर सर्वसामान्यांना हरकती नोंदवता आल्या नाहीत. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून एमएमआरडीए रिजनही मराठी आहे. असे असताना आराखडा इंग्रजीत प्रसिद्ध करून मराठीचा अवमान करण्यात आला आहे, असा आरोप वर्तक यांनी केला आहे.
आराखड्याविरोधात वसईतून आतापर्यंत तीस हजारांहून अधिक हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. आराखड्याविरोधात सभांनाही गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पुढची सभा शुक्रवारी संध्याकाळी रानगाव येथे होणार असून त्यात चंद्रशेखर प्रभू आणि फा. फ्रान्सिस दिब्रिटो मार्गदर्शन करणार आहेत.