दीड लाखाहून अधिक नायगावकर तहानले

By Admin | Updated: April 18, 2017 06:44 IST2017-04-18T06:44:14+5:302017-04-18T06:44:14+5:30

नायगाव पूर्वेला असलेल्या सुमारे दीड लाखांहून अधिक लोकवस्तीला अद्याप पाणी पुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने गेल्या दहा वर्षांहून अधिक

More than one and a half lakhs, Nayagaon thirsty | दीड लाखाहून अधिक नायगावकर तहानले

दीड लाखाहून अधिक नायगावकर तहानले

शशी करपे , वसई
नायगाव पूर्वेला असलेल्या सुमारे दीड लाखांहून अधिक लोकवस्तीला अद्याप पाणी पुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने गेल्या दहा वर्षांहून अधिक लोकांना दररोज टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहे. याठिकाणी दररोज किमान तीनशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा होतो. तर पिण्यासाठी बाटली बंद पाणी घ्यावे लागत आहे. त्यापोटी येथील लोक दरदिवसी साडेतीन लाखांहून अधिक रुपये खर्च करीत आहे. पण, आता पाण्याची वाट पाहून थकलेल्या मी नायगावकरांनी पाणी आमच्या हक्काचे असा नारा लगावत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या दहा वर्षात नायगाव पूर्वेकडे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आणि लोकसंख्येने दीड लाखांचा आकडाही पार केला. मुंबई आणि वसई विरार परिसरातील बिल्डरांनी २४ तास पाण्याच्या जाहिराती करीत चढ्या भावाने घरे विकली. आताही २४ तास पिण्याचे पाणी अशी जाहिरात बाजी करीत चक्क १४-१४ मजली टॉवरची कामे वेगाने सुुरु आहेत. पण, पाण्याचे वास्तव मात्र भयावह आहे.
नायगाव पूर्वेचा भाग खारटण असल्याने याठिकाणी भूगर्भात खारे पाणी आहे. त्यामुळे बोअरिंगचे पाणी वापरण्यालायक नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील लोक टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. पिण्यासाठी बाटली बंद पाणी घ्यावे लागते. येथील लोकसंख्या पाहता या परिसरात दिवसाला तीनशेहून अधिक टँकर पाणी लागते. सध्या एका टँकरचा दर बाराशे रुपये असून नायगावकर पाण्यापोटी दिवसाला साडेतीन लाखांहून अधिक पैसे खर्च करीत आहेत, अशी माहिती उपोषणाचे नेतृत्व करणाऱ्या प्रवीण गवस यांनी दिली.
याठिकाणी मोठी कॉम्पलेक्स समजल्या जाणाऱ्या रश्मी स्टार सिटीत दिवसाला वीस, रिलायबल मध्ये ८, गोकुळ मध्ये २०, मथुरामध्ये ७, वृदांवन टॉवरमध्ये ८, नालंदा टाऊनशिपमध्ये १८, वृदांवन-२मध्ये ८, अजंठामध्ये ६, सिटीझनमध्ये ६४, परेरानगरात २५, रश्मी पिंक सिटीमध्ये १६, ग्लोबल आरेनामध्ये ५ टँकरचा पाणी पुरवठा होतो. तर बाराशे खोल्या असलेल्या गणेश नगर चाळीत दिवसाला १५ टँकर पाणी लागते. ही फक्त कॉम्पलेक्ससाठी लागणाऱ्या टंँकरची आकडेवारी आहे. त्याचबरोबर आणखी किमान शंभर इमारती असून त्यांनाही दरदिवसी शंभर टँकर पाणी लागते. दुसरीकडे, टँकरचे पाणी पिण्यालायक नसल्याने लोकांना पिण्यासाठी महागडे बाटली बंद पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी माहिती आंदोलनकर्ते आमरेंद्र गोगटे यांनी दिली.
नायगावचा समावेश ६९ गाव पाणी पुरवठा योजनेत करण्यात आला आहे. या योजनेचा शुभारंभ २००७ साली अजीत पवार यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी पवार यांनी दीड वर्षांत ६९ गावांना पाणी पुरवठा सुरु होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ४५ लाख रुपये खर्चून याठिकाणी पाच वर्षांपूर्वी पाण्याची टाकीही बांधण्यात आली होती. पण, नायगावकरांना अद्याप नळ अथवा इतर पद्धतीने पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला नाही. पाणी नसताना महापालिका चौदा-चौदा मजली टॉवरना परवानगी देऊन अजूनही लोकांची फसवणुक करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी केला आहे. वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजनेतून पाणी देऊ असे आश्वासन आता दिले गेले आहे. मात्र, १०० एमएलडी पाणी महापालिकेला पुरणार नसल्याने ६९ गावांना पाण्यावाचून पुन्हा वंचित ठेवले जाणार आहे, असाही पाटील यांनी आरोप केला आहे.

Web Title: More than one and a half lakhs, Nayagaon thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.