निवडणूकीपूर्वी मतदार याद्या सुधारा, शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:12 IST2017-09-03T05:12:15+5:302017-09-03T05:12:19+5:30
तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत असून येत्या दोन महिन्यांत त्यांच्या निवडणूका प्रस्तावित आहेत.

निवडणूकीपूर्वी मतदार याद्या सुधारा, शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी
वाडा : तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत असून येत्या दोन महिन्यांत त्यांच्या निवडणूका प्रस्तावित आहेत. त्यासाठी २९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यातील प्रचंड घोळ व चुका दूर करा तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांच्या हरकतींसाठी दिलेली ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत एक आठवड्याने वाढवा अशी मागणी शिवसेनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यामध्ये ज्या प्रभागामध्ये मतदाराचे निवासस्थान आहे, त्या प्रभागाऐवजी दुसºयाच प्रभागाच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली असता ती तशीच ठेवणे, काही गावाच्या मतदार यादीत तर दुसºया गावातील व परप्रांतीय मतदारांची नावे समाविष्ट करणे अशा प्रकारच्या चुका मोठ्या प्रमाणावर असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ४ सप्टेंबरपर्यंतच्या हरकत मुदतीत पाच दिवस मिळत आहेत. त्यात दोन दिवस गौरी गणपतीचे सणासुदीचे असून दोन दिवस सुट्टीचे आहेत. त्यामुळे हरकतींची मुदत किमान एक आठवड्याने वाढविण्यात यावी योग्य ती कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.