आगीतील बेघरांचे पुनर्वसन करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी
By धीरज परब | Updated: February 28, 2024 20:22 IST2024-02-28T20:20:01+5:302024-02-28T20:22:23+5:30
आ. सरनाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले.

आगीतील बेघरांचे पुनर्वसन करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी
मीरारोड- भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर येथील बुधवारच्या भीषण आगीत सुमारे ५० ते ६० झोपड्या जळून बेघर झालेल्यांचे महापालिकेने एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. आ. सरनाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले . शिवसेनेच्या वतीने बेघरांच्या जेवण, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली.
आगीत सर्वकाही भस्मसात झाल्याने बेघर लोकांचे एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करावे अशी मागणी आ. सरनाईक यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दाद्वारे केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तात्काळ मुख्यमंत्री यांच्या लक्षात ही बाब आणून देतो आणि त्यांच्या माध्यमातून प्रशासनास निर्देश देण्यास सांगतो असे उत्तर दिल्याची माहिती आ . सरनाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
दरम्यान आ. सरनाईक सह शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आदींनी घटनास्थळी पाहणी केली. आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेत ज्यांच्या झोपड्या आदी जळाल्या त्यांच्याशी चर्चा करत मदतीचे आश्वासन दिले. आझाद नगर झोपडपट्टी अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेच्या सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान साठी आरक्षित जागेत या २५० ते ३०० झोपडया आहेत. या झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करावी असे आ . सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले.
आ. सरनाईक यांनी येथील नागरिकांच्या जेवण , चहा - नाश्ताची व्यवस्था केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडून घटनेची व जखमींच्या प्रकृती चौकशी केली. आगीमुळे ज्यांचे घर गेले आहे ते कोणीही बेघर होणार नाही असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले.