अनधिकृत पालिका चिन्हाचा गैरवापर
By Admin | Updated: September 19, 2015 23:34 IST2015-09-19T23:34:43+5:302015-09-19T23:34:43+5:30
पालिकेच्या चिन्हाच्या (लोगो) नोंदणीसाठी गेल्या २४ वर्षांपासून प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्य न दाखविल्याने त्याची अधिकृत नोंदणी अद्याप होऊ शकलेली नाही.

अनधिकृत पालिका चिन्हाचा गैरवापर
- राजू काळे, भार्इंदर
पालिकेच्या चिन्हाच्या (लोगो) नोंदणीसाठी गेल्या २४ वर्षांपासून प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्य न दाखविल्याने त्याची अधिकृत नोंदणी अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे चिन्हाचा गैरवापर शहरासह शहराबाहेर होऊ लागल्याचे उजेडात येऊनही प्रशासन त्याबाबत गांधारीची भूमिका वठवत असल्याची चर्चा शहरवासीयांत सुरू झाली आहे.
१९९१ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपालिकेने आपल्या हद्दीतील ९ ग्रामपंचायतींसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मिठागरे, डोंगराळ भाग आदींचा समावेश असलेले चिन्ह वापरात आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर, २००२ मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेसाठीही हाच लोगो व्यवहारात आणला जात आहे. कालांतराने पालिकेने सुरू केलेल्या वेबसाइटवर केवळ सोपस्कार पार पाडण्याच्या उद्देशाने वेबसाइटवर चिन्ह अपलोड केले आहे. परंतु, सामान्य नागरिकांना लोगोची माहिती व्हावी तसेच त्यात समाविष्ट केलेल्या बाबींविषयी आदर व्यक्त होण्याच्या उद्देशाने अद्याप कोणतीही माहिती वेबसाइटवर उपलब्ध केलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेल्या या चिन्हाची प्रशासनाने अद्याप शासकीय नोंदणी विभागाकडे नोंदच केली नसल्याचे उजेडात आले आहे. हा धक्कादायक प्रकार काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी २० फेब्रुवारी २०१३ रोजीच्या महासभेत सभागृहाच्या निदर्शनास आणला होता. त्या वेळी त्याच्या अधिकृततेसाठी लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांतही हे चिन्ह अद्याप अधिकृत होऊ शकले नाही. यामुळे अनेक जण पालिकेचा कोणताही संबंध नसताना खाजगी वाहनांवर तसेच त्यात खाडाखोड
करून हवे तसे वाक्य वा शब्द
लिहून त्याचा गैरवापर करीत आहेत.
हे चिन्ह प्रामुख्याने शहराचे
प्रथम नागरिक असलेल्या
महापौरांच्या आसनासह
पालिकेच्या प्रत्येक वाहन व नगरसेवकांच्या गाड्यांवर झळकाविण्यात येत आहे.
२२ नोव्हेंबर २०१२ रोजी पालिकेची वेबसाइट अहमद साजीद या बांगलादेशी नागरिकाने हॅक केली होती. त्यात या लोगोच्या नोंदणीची कल्पना अहमद यास आली असती तर कदाचित पालिकेला विनानोंदणीकृत चिन्हाचा मालकी हक्क गमवावा लागला असता. हा प्रकार भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.