ज्वेलर्स लुटण्यासाठी आलेली टोळी विरारमध्ये जेरबंद
By Admin | Updated: April 14, 2016 00:42 IST2016-04-14T00:42:35+5:302016-04-14T00:42:35+5:30
गुजरातमध्ये दरोडा टाकून विरारमधील ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारीच्या टोळीला अर्नाळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुजरातमधील लुटीच्या मालासह हत्यारे

ज्वेलर्स लुटण्यासाठी आलेली टोळी विरारमध्ये जेरबंद
विरार : गुजरातमध्ये दरोडा टाकून विरारमधील ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारीच्या टोळीला अर्नाळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुजरातमधील लुटीच्या मालासह हत्यारे जप्त करण्यात आली.
झारखंड, बिहार, गुजरात राज्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या व दरोडे घालणाऱ्या एका सराईत टोळीचे खतरनाक गुंड विरारमधील सागर ज्वेलर्स लुटण्यासाठी येत असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी आपल्या पथकासह पहाटेच्यावेळी सापळा रचला होता. पहाटे दीडच्या सुमारास दहा जण सागर ज्वेलर्सजवळ आले असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप मारली.
यावेळी मोहम्मद जमिल अली, मनीष टेकबहादूर शाहुद, जिरी हरंगी यादव , पप्पू रोहिल पासवान , बसंत कृष्णदेव पासवान , संजिद बिसुप्रसाद शर्मा, अन्सारुल हुसेन , कोकीला मदन विश्वकर्मा यांना अटक करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेऊन मदन विश्वकर्मा आणि कबीर शेख पळून गेले.
या दरोडेखोरांकडून दहा हजार रुपये रोख, पाच तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन त्याचबरोबर दरोडा टाकण्यासाठी आणलेला गॅसकटर, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, पकड, हॅकसॉ ब्लेड, रस्सी, सिलेंडर, लोखंडी प्रहार, सुरा. छिन्नी, हातोडी जप्त करण्यात आले. आरोपी जमील अली याच्याविरोधात दोन ज्वेलर्सच्या दुकानांवरील दरोडे आणि एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.