जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:53 IST2018-07-21T22:52:58+5:302018-07-21T22:53:35+5:30

नवऱ्याकडून टेंडरसाठी १० लाखांची मागणी; वडिलांची तक्रार

Married wife committed suicide | जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शहापूर / वासिंद : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी वासिंद पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी तिचा नवरा अशोक सुखदेव भोईर यास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
वासिंदजवळील साने गावातील करुणा अशोक भोईर या महिलेने १५ जुलै रोजी विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कल्याण तालुक्यातील गोवेली येथे राहत असलेले तिचे वडील सदा वामन चोरगे यांनी वासिंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
त्यात माझ्या मुलीच्या आत्महत्येला तिचा नवरा अशोक सुखदेव भोईर, सासू बारकुबाई सुखदेव भोईर आणि सासरा सुखदेव कथोड भोईर ही सासरची मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
अशोक हा पत्नी करुणा हिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. ग्रामपंचायतीकडून घेतलेल्या टेंडरसाठी १० लाख मागितले होते. त्यापैकी तीन लाख तिने माहेरून आणून दिले. उर्वरित पैशांसाठी तिच्यामागे वारंवार तगादा लावला जात होता.

> पैसे न आणल्यास घरातून हाकलू तसेच जीवे मारण्याची धमकी देत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता, असेही तक्रारीत म्हटले आहे.

> याप्रकरणी वासिंद पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ भांगरे करत आहेत.

Web Title: Married wife committed suicide