बाजारपेठा फुल्ल पण गर्दी तुरळकच
By Admin | Updated: November 10, 2015 00:12 IST2015-11-10T00:12:08+5:302015-11-10T00:12:08+5:30
ऐन दिवाळीत महागाईने सगळीकडे कळस गाठल्याने ‘अच्छे दिन’ची वाट बघणाऱ्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांची पुरती निराशा झाली आहे.

बाजारपेठा फुल्ल पण गर्दी तुरळकच
मोखाडा : ऐन दिवाळीत महागाईने सगळीकडे कळस गाठल्याने ‘अच्छे दिन’ची वाट बघणाऱ्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांची पुरती निराशा झाली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीचे आर्थिक बजेट ग्राहकांचे पुरते कोलमडले असून कमीअधिक प्रमाणात वस्तूंची खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये पणत्या, फटाके, फराळ, डाळी, तेल, आकाशकंदील खरेदीसाठी तुरळक गर्दी पाहावयास मिळत आहे. दिवाळी सण महत्त्वाचा असल्याने विशेषकरून लहान मुलांना व महिलावर्गाला आकर्षित करणाऱ्या फटाक्यांचे स्टॉल व रांगोळीचे स्टॉल ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वस्तूंचे भाव दुपटीने वाढलेले असल्याने ग्राहकवर्ग विचारपूर्वक ठरावीक वस्तूंची खरेदी करत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, बालगोपाळांचा फटाके खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. लक्ष्मीपूजन बुधवारी आल्याने व मंगळवार ग्रामीण भागात मोड्यांचा दिवस म्हणजेच शेतात काम न करण्याचा दिवस असल्याने त्या दिवशी बाजारपेठेमध्ये गर्दी होणार, अशी आशा व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे. (वार्ताहर)