राजभवनावर मोर्चा काढणार
By Admin | Updated: September 10, 2015 00:41 IST2015-09-10T00:41:40+5:302015-09-10T00:41:40+5:30
पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला नोकऱ्यांमध्ये देण्यात येणारे शंभर टक्के आरक्षण रद्द करावे, तसेच तलाठी भरतीला स्थगिती मिळावी, या मागण्यांसाठी बिगर आदिवासी

राजभवनावर मोर्चा काढणार
वाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला नोकऱ्यांमध्ये देण्यात येणारे शंभर टक्के आरक्षण रद्द करावे, तसेच तलाठी भरतीला स्थगिती मिळावी, या मागण्यांसाठी बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव समितीने वाडा येथे साखळी उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. हे आंदोलन अधिक आक्रमक होणार असून गणपतीनंतर ठाणे तसेच पालघर जिल्ह्यांतील बिगर आदिवासी राजभवनावर भव्य मोर्चा काढणार आहे.
साखळी आंदोलनामुळे वाड्यातील वातावरण तापले आहे. पालघर जिल्ह्यात तलाठी, सर्वेक्षण, ग्रामसेवक, अंगणवाडी, पर्यवेक्षक, शिक्षक या १२ संवर्गांतील सरकारी नोकऱ्यांमध्ये बिगर आदिवासी समाजास आरक्षण नाकारले असून ते अन्यायकारक आहे. जिल्ह्यात बिगर आदिवासी समाजाची सुमारे १८ लाखांहून अधिक लोकसंख्या असताना त्यांना ते नाकारून सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना त्यांच्यात आहे. ही भावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी गणेशोत्सवानंतर कुणबी, आगरी, वाणी, मुस्लिम, दलित, मराठी, शिंपी, न्हावी, लोहार इ. समाजांनी एकत्र येऊन वाडा ते राजभवन असा लाँग मार्च काढण्याचा निर्णय या वेळी समितीने घेतला आहे.
भाजपाचे नेते व वाडा पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनासंदर्भात समाधान व्यक्त केले. पालघर तालुक्यातील बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)