अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत
By Admin | Updated: August 25, 2015 23:10 IST2015-08-25T23:10:40+5:302015-08-25T23:10:40+5:30
वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत

अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत
वसई : वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत समिती प्रशासनाचे नियंत्रण नसणे अशा सर्व गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक शाळांत शिक्षक नसल्यामुळे सोमवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला.
वसईतील शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात असतो. चार वर्षापूर्वी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आग लागून महत्वाची कागदपत्रे जळाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात येऊनही तपासाचा अहवाल दडपण्यात आला. शिक्षकांच्या बदली प्रकरणीही अनेक गैरप्रकार आजवर घडले आहेत. या विभागाला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही. या पदाचा चार्ज कोणाकडे हा वाद सध्या विकोपाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
बेलकडी, लेंडीपाडा, दहीसर, बरफपाडा, वरठापाडा, म्हस्करपाडा, साष्टीकरपाडा, देपेवली, उसगाव, ताडपाडा, दिवेकरपाडा, बिबीपाडा, टेपाचापाडा येथील सर्व शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने वसई पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला होता. जोवर शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार वक्त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केला. तरी प्रशासन मात्र अजूनही मौनीबाबा आहे. (प्रतिनिधी)