वसई तालुक्यातील अनेक गावे पोलीस पाटलांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:51 IST2015-08-26T23:51:07+5:302015-08-26T23:51:07+5:30
वसई तालुक्यातील शिरवली, पारोळ, सायवन, आडणे, भाताणे, करजोण, सकवार, खानिवडे, शिवणसई या गावांच्या पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्याने तेथील नागरिकांना

वसई तालुक्यातील अनेक गावे पोलीस पाटलांविना
पारोळ : वसई तालुक्यातील शिरवली, पारोळ, सायवन, आडणे, भाताणे, करजोण, सकवार, खानिवडे, शिवणसई या गावांच्या पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्याने तेथील नागरिकांना पोलीस पाटलाच्या दाखल्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
पोलीस पाटील संकल्पना ब्रिटिश राजवटीतील असून गावातील सोडवता येण्यासारखे तंटे पोलीस पाटील गावपातळीवरच मिटवत असत. तसेच आपल्या क्षेत्रात होणाऱ्या गुन्ह्यांबाबतीत तेच सर्व माहिती पोलिसांना देत असत, म्हणून पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची मोलाची मदत होई.
तसेच सरकारी व नोकरीच्या कामासाठी लागणारे चांगल्या वर्तणुकीचे दाखलेही देत असत. त्याचप्रमाणे सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गावपातळीवर मतदान शांततेत पार पाडण्यामागे व मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असे. पण, या गावातील पोलीस पाटील निवृत्त झाल्याने प्रशासनाने नवीन पोलीस पाटलाचा भरणा केलाच नाही. एकंदरच पोलीस पाटील नसल्यामुळे या भागातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची स्थिती आहे. तर, काही पोलीस पाटील दोन, तीन गावांचा कारभार पाहत आहे.
तसेच याबाबत तक्रारी करूनही पोलीस पाटील भरतीचा जीआर प्रशासन काढत नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)