चंद्रपाडा-वाकीपाड्यात येण्यास मनाई आदेश

By Admin | Updated: April 16, 2016 00:33 IST2016-04-16T00:33:29+5:302016-04-16T00:33:29+5:30

वसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी

Mandatory order in Chandrapada-Wakipad | चंद्रपाडा-वाकीपाड्यात येण्यास मनाई आदेश

चंद्रपाडा-वाकीपाड्यात येण्यास मनाई आदेश

- शशी करपे,  वसई
वसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाच्या तीन दिवस आधीपासून बाहेरील लोकांना गावात येण्यास मनाई आदेश जारी केला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १७ एप्रिलला चंद्रपाडा आणि वाकीपाडा ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. दोन्ही गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मागील निवडणुकीतील राजकीय संघर्ष लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ते १८ एप्रिल अशा तीन दिवसांसाठी स्थानिक लोकांव्यतिरिक्त बाहेरील गावांतील लोकांना गावांत मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुचंद्र व पंचक्राशीतील गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील राहिली आहेत. २००४ मध्ये जुचंद्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन राजकीय गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. तर, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारावरून शिवसेना व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय हाणामारी झाली होती. या हाणीमारी प्रकरणात वालीव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. बाहेरील मतदानसंघातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत येऊन स्थानिक रहिवासी व भाडेकरू यांना धमकावून जबरदस्तीने आपल्या पक्षास मतदान करण्याचा धाक दाखवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे मत आहे.

येथील गावकऱ्यांची मते आणि राजकीय संघर्षाची शक्यता पालघर पोलीस अधीक्षकांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून देऊन तीन दिवसांसाठी गावातील ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील लोकांना गावात मतदानाच्या कामासाठी येण्यास बंदी होण्यासाठी सीआरपीसी १४४ (१)(२)(३) प्रमाणे मनाई आदेश निर्गमित करावेत, असे कळवले होते. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७६ चे कलम १४४ (२) व (३) अन्वये अधिकाराचा वापर करून १६ ते १८ एप्रिल या तीन दिवसांसाठी चंद्रपाडा व वाकीपाडा गावांत स्थानिक ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील गावातील लोकांना मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Web Title: Mandatory order in Chandrapada-Wakipad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.