जैमुनी पतपेढीच्या संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:44 IST2018-10-16T23:43:47+5:302018-10-16T23:44:07+5:30
- अजय महाडीक मुंबई : सदनिकांचे बनावट कागदपत्रं बनवून बनावट ग्राहकांच्या नावे कर्ज दिल्याच्या तसेच ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरुन ...

जैमुनी पतपेढीच्या संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल
- अजय महाडीक
मुंबई : सदनिकांचे बनावट कागदपत्रं बनवून बनावट ग्राहकांच्या नावे कर्ज दिल्याच्या तसेच ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरुन जैमुनी सहकारी पतपेढीच्या सर्व संचालकांसह व्यवस्थापकांवर अर्नाळा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यवसायिक सोहेल आरीफ मिथानी (४१) यांच्या तक्रारीवरुन सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार (प)मध्ये असणाऱ्या भव्य हाईट्स या प्रकल्पामध्ये क्र. ई/७०५ या साडे सहाशे चौ. फुटाच्या सदनिकेचे बनावट गहाण खत करुन २५ लाख रुपयांची फसवणूक पतपेढीच्या संचालकांनी केली आहे तसेच, या भागातील ओम साई इन्फ्राचे भागीदार बिल्डर यांच्याकडून सेक्टर ७, गाव मौजे डोंगरे (विरार पश्चिम) येथील गृहप्रकल्पातील सदनिका क्र. बी/३०५ ही मला विकलेली असतांना ती दुसºयाच्या नावावर असल्याचे भासवून बनावट गाहण खत बनवून २२ लाख रुपये कर्ज मंजूर केले. त्याच बरोबर पन्नास पेक्षा अधिक सदनिकांचे बोगस कागदपत्र बनवून मोठ्या रक्कमेचे गहाण कर्ज जैमुनी सहकारी पतपेढी, उमराळा यानी दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या प्रकरणीही अर्नाळा पोलीस स्टेशन मध्ये संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या फ्लॅटच्या खरेदीपोटी त्यांनी मे मोरीया रिअलटर्सचे भागिदार अविनाश ढोले यांना रोख स्वरुपात, धनादेशाने व गृह फायनान्स कंपनीच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची रक्कम अदा केली होती. तसेच १ लाख ७५ हजाराचे रजिस्ट्रेशन शुल्क भरुन दुय्यम निबंधक कार्यालय वसई -२ मध्ये त्या दस्ताची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये पतपेढीच्या माध्यमातून ढोले यांनी रंजीत गोमाणे, दिलीप कांबळे, अरुण गावडे, हितेश घरत, संदिप रुपे, प्रमोद बांद्रे, उमेश तरे, अक्षय टिळवे, शिवाजी कोळेकर, गुरुराज पै या सर्वांना ढोले यांच्या नावे लबाडीने सदनिकाधारक दाखवून तसेच आपसात संगनमत करुन जैमुनी पतपेढीतून कर्ज मंजूर केले आहे.
याचे बनावट कर्ज प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यांना आदर्श कर्ज प्रस्ताव मंजुरी प्रक्रीयेचा अवलंब न करता बेकायदेशिरपणे मंजूरी देण्यात आली आहे. हे प्रस्ताव सर्च रिपोर्ट न घेता जैमुनी पतपेढीने घाईघाईने मंजूर करुन घेतले आहेत. दरम्यान , सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रकरणावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी सामवेदी समाजाचे नेते व त्या एजीएमचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी डबल मॉर्टगेजची २२ प्रकरणे उपस्थित झाले होती. मात्र, त्यांची थकबाकी वसूल करण्यात आल्याचे सांगितले गेले. तर समाजाचे अध्यक्ष राजन नाईक यांनी डबल मॉर्टगेजचे प्रकरण आता मिटले आहे असे सांगून वेळ मारून नेली होती. परंतु आता गुन्हा दाखल झाला आहे.