व्हॉटसअॅप सोडा - सानेकर
By Admin | Updated: February 29, 2016 01:37 IST2016-02-29T01:37:50+5:302016-02-29T01:37:50+5:30
आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे

व्हॉटसअॅप सोडा - सानेकर
विरार : आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे, असे प्रतिपादन सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रमुख डॉ.वीणा सानेकर यांनी केले. विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त्त बदलती मराठी भाषा एक आव्हान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठी माणूसच आज मराठी भाषेपासून दुरावत चालला आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
समाजात आज अनेक वर्ग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणासाठी मराठी वापरली गेली, मतांसाठी मराठी वापरली गेली मात्र याच राजकारण्यांची मुले आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मराठी भाषा बोलणारी माणसं आज सिंहासनावर बसली मात्र मराठी भाषा आज सिंहासनावर आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला शिवाजी महाराज व बाबा आमटे आवडतात, त्यांचे कार्य आवडते व या कार्यावरील चित्रपटही आवडतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्यासाठी फार थोडे पुढे येतात. केवळ शुभेच्छापत्रांवर किंवा टी-शर्टवर मराठी गीताच्या दोन चार ओळी लिहिणे एवढेच मराठीपण नाही मात्र मुले याकडेच वळतात कारण हे सोपे आहे. आपल्या भाषेचा आदर हा आपल्याला मनापासून असायला हवा असेही त्यांनी पुढे सांगितले.
चीन व सौदी अरेबियाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की या देशांमध्ये त्यांना अपेक्षित असे त्यांच्या भाषेचा समावेश असलेले संगणकच बनवले जातात मात्र भारतात तसे दिसून येत नाही. इंग्रजी भाषा बोलण्यात मराठी मुलांनी कुठेच मागे राहू नये. मात्र ती बोलत असताना आपली भाषा कुपोषित ठेवू नका असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. कविता पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.हर्षिवर्धनी बोरवणकर यांनी केले तर प्रा.रूपाली पाटील यांनी आभार मानले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त दुसऱ्या पर्वात काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.
आपली दिवसाची सुरवातच व्हॉट्सअॅप वरून गुड मॉर्नींगने होत. परंतु, जगातील शक्तीशाली देशांनी आपापल्या भाषेत कारभार व्यवहार केले म्हणून ते पुढे गेले, असेही मत त्यांनी मांडले.