सुरक्षा उपकरणांचा प्रवासी बोटींमध्ये अभाव; पालघर, डहाणू तहसीलदारांकडून नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 11:21 IST2024-12-21T11:20:44+5:302024-12-21T11:21:44+5:30
याची दखल घेत पालघर आणि डहाणू तहसीलदारांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

सुरक्षा उपकरणांचा प्रवासी बोटींमध्ये अभाव; पालघर, डहाणू तहसीलदारांकडून नोटिसा
हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : ‘नीलकमल’ बोट दुर्घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील अनेक प्रवासी बोटींमध्ये लाइफ जॅकेटसह संरक्षण उपकरणे ठेवली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये (२० डिसेंबर) प्रसिद्ध झाले. याची दखल घेत पालघर आणि डहाणू तहसीलदारांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी- मुरबे, दांडी- नवापूर, कोसेसरी- भोवाडी, डहाणू- धाकटी डहाणूदरम्यान भागातील प्रवासी, विद्यार्थी, कामगार ज्या बोटीतून प्रवास करतात, तो प्रवास अत्यंत धोकादायक आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात, तसेच अनेक बोटींमध्ये पुरेशी संरक्षण उपकरणे नसल्याने एखादा अपघात घडल्यास मोठ्या प्राणहानीला सामोरे जाण्याची पाळी उद्भवू शकते.
डहाणू तालुक्यातील कोसेसरी- भोवाडी परिसरातील सूर्या नदीवरून स्थानिक विद्यार्थी व नागरिकांना नदी पार करण्यासाठी लाकडी बोट, तराफ्यांचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर एक दोरी बांधून प्रवाशांना, विद्यार्थ्यांना दोरी खेचून किनारा गाठावा लागत आहे. या प्रवासात वापरण्यात येणारी होडी ही सुरक्षित नसून, स्थानिक कारागिराकडून बनविलेली होडी जोराच्या प्रवाहाने बुडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन एखादी प्राणहानीची घटना घडण्याआधीच प्रवासी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.
सर्व ग्रामपंचायतींना नोटिसा बजावून संरक्षण उपकरणे आणि प्रवाशांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - रमेश शेंडगे, तहसीलदार, पालघर
डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असून, तत्काळ उपाययोजना आखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. - सुनील कोळी, तहसीलदार, डहाणू