कुडूस आठवडाबाजार देत आहे काेराेनाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:11 IST2021-02-26T23:11:07+5:302021-02-26T23:11:13+5:30
वाडा : सध्या राज्यभर कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. शहरांसह खेडोपाड्यांत हात-पाय पसरत असून, एवढे मोठे संकट आपल्या ...

कुडूस आठवडाबाजार देत आहे काेराेनाला निमंत्रण
वाडा : सध्या राज्यभर कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. शहरांसह खेडोपाड्यांत हात-पाय पसरत असून, एवढे मोठे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत असतानाही कुडूस आठवडा बाजार सुरूच असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तुफान गर्दी, विनामास्क ग्राहक-विक्रेते, सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असल्याचे आठवडा बाजारात पाहायला मिळत आहे. नकळत हा बाजार कोरोनासारख्या महामारीला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. या आठवडाबाजारातील ग्राहक व विक्रेते नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुडूस ही तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरत असतो. ५२ गावचे नागरिक येथे बाजारहाट करण्यासाठी येत असतात. या गावची लोकसंख्या १० हजारांवर असून या भागात कारखानदारी असल्याने परप्रांतीयही मोठ्या संख्येने आहेत. नाशिक, भिवंडी, कल्याण, वसई, सातपाटी आदी ठिकाणांहून व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात. तर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक बाजार करण्यासाठी येथे येत असतात.
५२ गावची बाजारपेठ तसेच परप्रांतीयांचा मोठा भरणा असल्याने या बाजारात मोठी गर्दी असते. विनामास्क व सामाजिक अंतर या नियमांचे उल्लंघन अनेक नागरिकांकडून होताना दिसले.शुक्रवारी कुडूस येथील आठवडाबाजारात मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन हा आठवडा बाजार काही काळ बंद करण्याची गरज असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.