कोपरफाटा उड्डाणपुलाचे काम सुरू
By Admin | Updated: February 12, 2017 02:57 IST2017-02-12T02:57:17+5:302017-02-12T02:57:17+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपर फाटा येथे महामार्गावरील उड्डाण पूलाच्या कामाला सुरवात झाली असून सर्व्हिस रोडचेही काम चालू झाले आहे.

कोपरफाटा उड्डाणपुलाचे काम सुरू
पारोळ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपर फाटा येथे महामार्गावरील उड्डाण पूलाच्या कामाला सुरवात झाली असून सर्व्हिस रोडचेही काम चालू झाले आहे. यामुळे काशीद कोपर परिसरातील गावे व पाड्या वस्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गाव, पाडे व वस्त्यांमधील महामार्गाच्या प्रवासावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, रु ग्ण, कामगार व नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्याचे सहा पदरीकरण झाल्यापासून त्यावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन तो ओलांडावा लागतो. आजपर्यंत महामार्ग ओलांडताना शेकडो बळी गेले असून हजारोंना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यासाठी प्राधिकरणाने महामार्गावर उड्डाण पूल निर्माण केले आहेत. मात्र अजूनही काही रहदारीच्या ठिकाणी उड्डाण पूल होणे बाकी आहेत . त्यापैकीच हा पूल होता. तो व्हावा अशी मागणी महामार्गाचे रूंदीकरण काम सुरु झाल्यापासूनची होती. अनेक वर्ष बहुप्रतिक्षेत राहिलेल्या या मागणीची लवकरच पूर्तता होणार असून येथे सर्व्हिस रोड बनविण्याच्या कामालाही सुरवात झाली आहे.
या ठिकाणी उड्डाणपुल व्हावा ही मागणी गावाकऱ्यांनी केली होती त्या मागणीला आता यश आल्याचे सेनेचे मिलिंद किणी यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)