अपहरण झालेल्या तरूणाची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:04 IST2019-07-25T23:04:00+5:302019-07-25T23:04:30+5:30
या तरुणाची सुखरूप सुटका करून बुधवारी रात्री त्याला वसईला आणण्यात आले असून फरार दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

अपहरण झालेल्या तरूणाची सुखरूप सुटका
मंगेश कराळे
नालासोपारा : वालीव येथे राहणारा समसुल कमर शकील खान (३०) हा तरुण १४ जुलैला कामानिमित्त कोलकत्यात गेला होता. मात्र, हावडा रेल्वे स्थानकावरून त्याचे २० लाख रूपयांसाठी अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. तरुणाच्या वडिलांना फोनवरून आलेल्या धमकीनंतर वालीव पोलीस ठाण्यात जाऊन १६ जुलैला गुन्हा दाखल झाला होता. या अपहृत तरुणाचा शोध घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची एक टीम रवाना झाली होती. या तरुणाची सुखरूप सुटका करून बुधवारी रात्री त्याला वसईला आणण्यात आले असून फरार दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पैशांसाठी अपहरण केलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आणि मुलाचे वडील अशी टीम गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेल्या गुरुवारी कोलकत्याला रवाना झाली.
मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी २५ ते ३० फोन करून वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. मात्र, ते समोर येत नव्हते. दरम्यान, वालीव पोलिसांनी कालीचा चक पोलीस ठाण्यातील पोलिसांशी संपर्क साधून अपहरण झालेल्या तरुणाची माहिती दिली.
वालीव पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केल्यावर कालीचा चक पोलीस ठाण्यातील २ ते ३ पोलीस निरीक्षक, २५ ते ३० आर्मी, कमांडो आणि पोलिसांचा फौजफाट्यासह ४ गाड्या घेऊन रात्रीच्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा घालण्यात आला.
कसा सापडला तरुण : घरातील मंडळींना पोलीस ठाण्यात आणून विचारपूस करण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्याच्या बॉर्डरजवळील गंगा नदीच्या बाजूलाच असलेल्या जंगलात आरोपी जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळवली. घरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आरोपीला मिळाल्यावर अपहरण केलेल्या तरुणाची अखेर पाच दिवसांनी पोलिसांनी सुटका केली. आपल्या मुलाची सुखरूप सुटका झालेली पाहून वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.