वसई विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे वरिष्ठ आरेखकार खंडेराव गुरुखेल यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 16:41 IST2021-06-05T16:41:17+5:302021-06-05T16:41:37+5:30
महापालिका प्रशासन व नगररचना विभागात शोककळा

वसई विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे वरिष्ठ आरेखकार खंडेराव गुरुखेल यांचे निधन
- आशिष राणे
वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील वरिष्ठ आरेखकार (ड्राफ्ट्समन) खंडेराव लक्ष्मण गुरुखेल रा.विरार जीवदानी रोड यांचे शनिवारी सकाळी वसई पुर्वेतील खाजगी रुग्णालयात निधन झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ किशोर गवस यांनी लोकमतला दिली.
मागील दोन आठवड्यापासून त्यांच्यावर वसई पूर्वेतील खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते,मृत्यु समयी ते 51 वर्षाचे होते. मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका स्थित तोंडार गावचे सुपुत्र खंडेराव गुरुखेल हे नोकरी निमित्त ठाणे -पालघर जिल्हात आले आणि विरार पूर्वेस स्थायिक होतानाच ते नवी मुंबईतील सिडको प्राधिकरणात रुजू झाले.
दरम्यान वसई तालुक्यात सन 1995 साली सिडको स्थापन झाली व ती झाल्यापासूनच ते येथे आरेखकार म्हणून कार्यरत झाले होते . आधी वसईतील चार नगरपालिका आणि तदनतर 2009 साली वसई विरार शहर महापालिकेची निर्मिती झाली आणि पुन्हा खंडेराव गुरुखेल हे नगररचना विभागाचे वरिष्ठ आरेखकार म्हणून कार्यरत झाले.
आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये ही ते महापालिका प्रशासनात कार्यरत होते तर शांत, मितभाषी सर्वांना सहकार्य करणारे गुरुखेल यांचा वसईतील विकासात एक उत्तम आरेखकार म्हणून योगदान राहिले असून त्यांच्या अचानक जाण्याने महापालिका प्रशासन,नगररचना विभाग आणि इंजिनिअर, विकासक आणि पक्षीय मंडळी आदींनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे.