डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील प्रवास धोकादायक
By Admin | Updated: March 20, 2016 00:44 IST2016-03-20T00:44:29+5:302016-03-20T00:44:29+5:30
सूर्या नदीवरील डहाणू - जव्हार, विक्रमगड नाशिक यांना जोडणारा ब्रिटीशकालीन कासा पूल जीर्ण झाल्याने सूर्या नदीवर ३ कोटीच्या खचार्तून नवा उड्डाणपूल बांधून तयार आहे.

डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील प्रवास धोकादायक
डहाणू : सूर्या नदीवरील डहाणू - जव्हार, विक्रमगड नाशिक यांना जोडणारा ब्रिटीशकालीन कासा पूल जीर्ण झाल्याने सूर्या नदीवर ३ कोटीच्या खचार्तून नवा उड्डाणपूल बांधून तयार आहे. मात्र कासाच्या दिशेने नवीन पुलाला जोडणारा राज्यमार्ग वनविभागाच्या जागेतून जातो. वन विभागाच्या परवानगी अभावी पुलाची साईडपट्टी पूर्ण होऊ शकली नाही परिणामी पूल बांधून तयार आहे मात्र वन आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात समन्वय नसल्याने जनतेचे मात्र हाल होत आहेत. मागील तीन वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात पुलाच्या वाढीव खर्चाची मंजूरी रखडल्याने ठेकेदाराने पूलाचे काम कूर्मगतीने सुरू ठेवले होते.
पुलाला मंजूरी मिळून अनेक वर्ष लोटली. पूल बांधून तयार आहे मात्र जोड रस्ता तयार नसल्याने रहिवाशांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. सूर्या नदीवरील नवा बांधलेला पूल वाहतूकीसाठी त्वरित खुला करावा, अशी रहिवाशांची मागणी होत आहे.
डहाणू-नाशिक मुख्य राज्यमार्गावरील सूर्या नदीवर कासा हा महत्वाचा पूल आहे. अवजड वाहनांसह या परिसरातील हजारो प्रवासी वाहनांची वाहतूक करणारा हा ब्रिटीशकालीन पूल देखभाली अभावी कोसळण्याच्या तयारीत आहे. तर डहाणू तालुक्यातील वेती वरोती, सुर्यानगर, कवडास, मुरबाड, वांगर्जे, तलवाडा या परिसरातील चाळीसहून अधिक गावांना वरदान ठरलेल्या या पुलाचे आयुष्य संपलेले आहे. येथील कासा पुलाच्या खांबाचे दगड निखळून पडू लागले आहेत. मात्र दुसरा पर्याय नसल्याने धोका पत्करून प्रवाशांना जीर्ण पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे पूल जीर्ण झाला तरीही दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या बेजवाबदार कारभारामुळे हजारो प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. यामुळे डहाणू-जव्हार राज्यमार्गाचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील सूर्या नदीवर डहाणू-जव्हार-त्र्यंबक रस्त्यावर कासा येथे सूर्य नदीवर पूल बांधण्यासाठी ३ कोटी मूळ रक्कम मंजूर झाल्याचे खात्याकडून माहिती देण्यात आली. कुंभमेळयात सुरक्षित वाहतुकीसाठी डहाणू-त्र्यंबक राज्य मार्ग दुरूस्तीसाठी कोटयावधीचा निधी खर्च करण्यात आला मात्र कुंभमेळयातही भाविकांना राज्यामार्गावरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला नव्हता.
कासा पूल बांधून तयार आहे. वन विभागाच्या परवानगीअभावी हा पूल रखडलेला आहे. ही प्रक्रिया अंतीम. टप्प्यात आहे. लवकरच वाहतुकीसाठी पूल मोकळा करण्यात येईल.
-तोटावार, उप अभियंता, डहाणू सा. बां. विभाग
प्रशासनाच्या खात्यात समन्वय नाही. हे येथील जनतेचे दुर्दैव
-स. दा. घारपुरे, सुज्ञ नागरिक
कासा येथील नवीन पूल सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून डहाणू तालुका पर्यावरणाची परवनगी लवकरच मिळणे अपेक्षीत आहे. त्यामुळे पावसाळयापूर्वी या पुलावरून वाहतुक सुरू होईल.
- ए. बी. चौधरी, शाखा अभियंता, डहाणू सा. बा. विभाग