अर्नाळा बीचवर जिग्नेशला जेली फिशचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:37 IST2018-10-09T00:09:36+5:302018-10-09T00:37:02+5:30
आपल्या मित्रांबरोबर अर्नाळा बीचवर खेळणाऱ्या जिग्नेश तांडेलला रविवारी जेली फिशने चावा घेतला. त्याच्यावर नेमके काय उपचार करायचे याची कल्पना नसल्याने दोन डॉक्टरांनी त्याला पेनकिलर देऊन मुंबईस नेण्याचा सल्ला दिला.

अर्नाळा बीचवर जिग्नेशला जेली फिशचा डंख
विरार : आपल्या मित्रांबरोबर अर्नाळा बीचवर खेळणाऱ्या जिग्नेश तांडेलला रविवारी जेली फिशने चावा घेतला. त्याच्यावर नेमके काय उपचार करायचे याची कल्पना नसल्याने दोन डॉक्टरांनी त्याला पेनकिलर देऊन मुंबईस नेण्याचा सल्ला दिला.
अर्नाळा नाळेपाडा येथील राहणारा जिग्नेश रविवारी सायंकाळी आपल्या मित्रांबरोबर समुद्रात खेळत असताना जेली फिशने त्याच्या पायाला पकडले. होऊ लागलेल्या वेदनेने जिग्नेश जोराजोरात रडू लागला. त्याचा आवाज ऐकून गावकºयांनी धाव घेऊन त्याला पाण्यातून उचलले असता जेली फिशने त्याला पकडल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी ओरबाडून जेली फिश पायावरु न काढून टाकली. पण तिचे काटे त्याच्या पायात रुतून राहिल्याने त्याला यातना होऊ लागल्या. त्याला त्वरीत गावातील दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांना त्यावर काय उपचार करायचे हे न कळल्याने त्यांनी पेनकिलर देऊन त्याला विरार येथील संजीवनी रु ग्णालयात घेऊन जा असे सांगितले.
संजीवनी रु ग्णालयातही तशीच परिस्थिती असल्याने त्यांनीही त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्याला होत असलेल्या यातना बघता मुंबई पर्यंतचा प्रवास करणे शक्यच नव्हते. हे बघून वसई पंचायत समितीच्या माजी सदस्या ज्योती कुडू यांनी आगाशी आरोग्य केंद्राचे डॉक्टर ऋ ग्वेदन दुधाट यांच्याशी संपर्क केला. त्यांनी विरार मधील अंकुर हॉस्पिटलचे डॉ. शैलेश बारोट यांच्याशी चर्चा करुन जिग्नेशला अंकुर हॉस्पिटलमध्ये दाखल करवून घेतले. त्यांनी विचारविनिमय करु न त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. वसई तालुक्याला विस्तीर्ण किनारा लाभलेला आहे. जेली फिशने डंख मारल्याची ही पहिलीच घटना आहे.
औषध उपलब्ध करून द्या
भविष्यात ही अशी घटना घडू शकते, हे लक्षात घेऊन शासनाने वसई तालुक्यातील डॉक्टर आणि जनतेमध्ये याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. दुधाट यांनी व्यक्त केले. तर शासनाने पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात जेली फिशच्या डंखावरील प्रभावी औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध करु न द्यावे, अशी मागणी ज्योती कुडू यांनी केले आहे.