महाराष्ट्र बँकेने घातला जव्हारला मंडप
By Admin | Updated: April 20, 2017 23:56 IST2017-04-20T23:56:49+5:302017-04-20T23:56:49+5:30
शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत होते

महाराष्ट्र बँकेने घातला जव्हारला मंडप
जव्हार : शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत होते, त्यामुळे लोकमतने अपुऱ्या जागेमुळे बॅँकेबाहेर रांगा या मथळ्या खाली बातमी प्रसिध्द केली होती. त्यामुळे बॅँकेने खातेदारांच्या सोयी साठी मोठा मंडप बांधून घातला आहे. लोकमतने प्रसिध्द केलेल्या बातमीमुळेच आमची उन्हातली रखडपट्टी थांबल्याने आम्ही लोकमतचे आभार मानतो अशी कृतज्ञता येथील गरीब, आदिवासी खातेदारांनी व्यक्त केली आहे.
जव्हारमध्ये महाराष्ट्र बॅँकेची गांधी चौक येथे एकमेव शाखा खूपच तोकड्या जागेत आहे, या बॅँकेत हजारो ग्राहकांची खाती आहेत, मात्र अपुऱ्या जागेमुळे या बॅँकेच्या बाहेर नेहमीच गर्दी होऊन वाहातूककोंडी होत असते, तसेच बॅँकेच्या बाहेर ग्राहकांची रांग ही २० ते २५ मीटर लांब सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० या काळात लागत असते.
उन्हाळ्यात अशा रांगेत उभे रहाणे म्हणजे शिक्षाच होती. त्यात नेट स्लो असणे, कनेक्टिव्हीटी जाणे यामुळे कामाच्या मंद गतीची भर पडायची व उन्हातळी रखडपट्टी वाढायची. महिला ग्राहकांचे व ज्येष्ठांचे हाल व्हायचे. बसण्यासाठी नाही तर निदान उन्हापासुन बचाव करण्यासाठी बॅँकेच्या बाहेर मंडप टाकावा अशी मागणी येथील ग्राहकांनी लोकमतद्वारे केली होती. तिची पूर्तता या मंडपामुळे झाली आहे. (वार्ताहर)