जयसागर डॅमची गळती थांबणार
By Admin | Updated: March 27, 2016 02:18 IST2016-03-27T02:18:33+5:302016-03-27T02:18:33+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला लागलेली गळती थांबविणाऱ्या कामाची निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्यामुळे जव्हारकरांत समाधान व्यक्त होत आहे.

जयसागर डॅमची गळती थांबणार
- हुसेन मेमन, जव्हार
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला लागलेली गळती थांबविणाऱ्या कामाची निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्यामुळे जव्हारकरांत समाधान व्यक्त होत आहे. या धरणातून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी गळतीमुळे वाया जात असल्याने नागरिकांत पाणीटंचाईची भीती व्यक्त होत होती. आधीच पाणीपुरवठा कमी होत आहे, त्यात ही गळती. तसेच नगरपालिकेने या कामाला विलंब होऊ नये म्हणून तातडीने निविदा मागविल्या होत्या. परंतु निविदांना सर्वसाधारण सभेची मंजुरी लागते आणि जव्हार नगरपरिषदेतील १७ पैकी १० सदस्य अपात्र घोषित केलेले असल्याने सर्वसाधारण सभाच होत नव्हती. म्हणून ही निविदा थेट जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मंजुरीकरिता पाठवण्यात आले होते. तसेच याचा पाठपुरावा मुख्याधिकारी वैभव विधाते आणि अभियंता बी.डी. क्षीरसागर हे सतत करीत असल्याने आणि नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी केलेल्या मागणीवरून पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दि. २१/०३/२०१६ रोजी निविदा प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे. जयसागर धरण हे संस्थानकालीन असून राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधले होते, परंतु दिवसागणिक लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे डॅमचे पाणी अपुरे पडत आहे. त्यात यंदाच्या वर्षात धरणाला चांगलीच गळती लागल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरून तत्काळ दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, निविदा अथवा कुठल्याही प्रक्रियेला सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असल्यामुळे निविदा प्रकिया पूर्ण होऊनही सभेची मंजुरी नसल्यामुळे निविदा प्रकिया रखडून होती.
सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत पाणी वाया जात आहे आणि निविदा प्रक्रिया पाणीपुरवठ्याशी निगडित असल्याने तसेच यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी निगडित असून महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०९ अन्वये निकडीच्या परिस्थितीत विविक्षित कामाची अंमलबजावणी करण्याचे असाधारण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले असल्याने पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी त्यांच्या अधिकारानुसार काम पार पाडण्यास न्यूनतम दर असलेले श्रीशैल आसगी या निविदाकाराची निविदा मंजूर केली.
आम्हाला हे समजल्यावर आम्ही तत्काळ धरणाला भेट देऊन गळती थांबवण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्याकरिता मुख्याधिकाऱ्यांना सुचवले व त्यानुसार निविदा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून तत्काळ गळती थांबवण्याचे काम सुरू केले आहे.
- संदीप वैद्य, नगराध्यक्ष, जव्हार नगरपालिका, जव्हार