जय भवानी, जय चिमाजी, जय वज्राईचा जय घोष...सुनिल घरत ।
By Admin | Updated: May 14, 2017 22:40 IST2017-05-14T22:40:17+5:302017-05-14T22:40:17+5:30
नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या शूरवीरांनी, जुलमी, अराजक व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अश्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेचे उत्तर कोंकणातून समूळ उच्चाटन केले

जय भवानी, जय चिमाजी, जय वज्राईचा जय घोष...सुनिल घरत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या शूरवीरांनी, जुलमी, अराजक व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अश्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेचे उत्तर कोंकणातून समूळ उच्चाटन केले. तो दिवस म्हणजे वसई चा विजयोत्सव. मराठेशाहीच्या विजयाचे हे २७९ वे वर्ष सल्याने ते शहरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या उत्सवा निमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन केले होते.
पोर्तुगीजांच्या अराजकतेमुळे, धर्मांधतेमुळे, भेदाभेदामुळे, जुलमामुळे हैराण झालेल्या वसईकर रयतेला मुक्त व सुखी करण्यासाठी बाविस हजार मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका युरोपीय सत्तेविरूद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय होता. वसई जिंकण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी योगिनी वज्रेश्वरी देवीकडे नवस केला होता. पुढे वसईवर भगवा जरीपटका फडकला व वसईतील रयत पुन्हा सुखी झाली. या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून गेल्या सात वर्र्षांपासून वसई-विरार महानगरपालिके तर्फे वज्रेश्वरी ते वसई किल्ला ‘भव्य मशालयात्रेचे’ आयोजन करण्यात येते. या वर्षी मशालयात्रेत १५० दुचाकी व १०० हून अधिक सायकल स्वारांनी भाग घेतला होता. वज्रेश्वरी मंदिरात आरती करून मशालयात्रेचे उद्घाटन वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या हस्ते झाले. नरवीर चिमाजी आप्पांच्या व मावळ्यांच्या पोषाखातील ‘आमची वसई’ च्या सदस्यांनी मशाल मिरवत पुढे नेली. ठीक ठिकाणी मशालयात्रेचे स्वागत करण्यात आले. किल्ल्यात मशाल यात्रेच्या स्वागतासाठी पालघरचे खासदार चिंतामण वनगा, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे माजी आमदार डॉमनिक घोंसाल्वीस, महापालिका महापौर प्रवीणा ठाकूर, बसीन कॅथोलीक बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी ‘जाणता राजा शिवछत्रपती’ हे महानाट्य बघण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. खाद्यमहोत्सव व बालजत्रेचा आनंद घेत कार्यक्र माची सांगता झाली. आमची वसई सामाजिक समुहाने वसई विजयोत्सव आयोजित करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अभिनंदन केले.