वाढवण बंदर अदानींकडे सोपवणे धोकादायक; राजेंद्र गावित यांचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:31 IST2020-10-08T01:31:09+5:302020-10-08T01:31:12+5:30
केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे दर्शवला विरोध

वाढवण बंदर अदानींकडे सोपवणे धोकादायक; राजेंद्र गावित यांचे वक्तव्य
पालघर : केंद्र आणि राज्य सरकारसह जेएनपीटी अदानीसारख्या उद्योगपतीला वाढवण बंदरासाठी प्राधान्य देत असेल, तर हा देशाला सर्वात मोठा धोका असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ‘लोकमत’कडे केले.
केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करताना आपण याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
डहाणूचे ५०० मेगावॅट क्षमतेचे थर्मल पॉवर स्टेशन उद्योगपती अंबानीकडून अदानी यांनी विकत घेतले. केंद्र व राज्य सरकार आणि जेएनपीटीच्या भागीदारीतून उभे राहणारे वाढवण बंदर अदानीसारख्या अविश्वसनीय उद्योगपतींना देण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर यासारखे छोटे उद्योगधंदे वाढवण बंदराच्या उभारणीमुळे उद्ध्वस्त होणार असल्याने माझा या बंदराला १०० टक्के विरोध राहणार असल्याचे त्यांनी राज्यमंत्र्यांना व्हीसीद्वारे कळवले.
पालघर जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंबंधी एक प्रस्ताव राज्यमंत्र्याकडे सादर केला होता. निर्मल सागर तट समृद्धी योजनेंतर्गत सादर केलेल्या त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने २४ हजार कोटींच्या विविध कामांना त्यांनी मंजुरी दिल्याचे सांगून पालघर जिल्ह्यात ४२ कामांचा समावेश आहे. सातपाटी-मुरबे येथील मच्छीमारांच्या बोटी उभ्या करण्यासाठी मच्छीमारी बंदर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्कायवॉक
वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्कायवॉक उभारला जाणार असून एक मच्छीमार जेटी उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. किनारा पर्यटन अंतर्गत एडवण, कोरे, केळवे, चिंचणी, वाणगाव, नवापूर, आणि बोर्डी आदी भागांमध्ये अनेक सोयीसुविधा उभ्या करण्यात येणार असल्याचे खासदारांनी सांगितले.