सफाळ्याचे वाढीव बेट काळोखात

By Admin | Updated: July 14, 2014 01:36 IST2014-07-14T01:36:02+5:302014-07-14T01:36:02+5:30

सफाळे-वैतरणा स्टेशनच्या दरम्यान उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील सुमारे दोन हजार नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणी इ. सोयीसुविधा मिळविण्यासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे

The Island of Separation in the Black Island | सफाळ्याचे वाढीव बेट काळोखात

सफाळ्याचे वाढीव बेट काळोखात

पालघर : सफाळे-वैतरणा स्टेशनच्या दरम्यान उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील सुमारे दोन हजार नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणी इ. सोयीसुविधा मिळविण्यासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. यातच मागील तीन दिवसांपासून या बेटावरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव काळोखात बुडाले आहे. विद्युत वितरण सफाळे कार्यालयाला अनेक वेळा कळवूनही या गंभीर घटनेची दखल घेण्याची सवड त्यांना नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे व वैतरणा स्टेशनच्या दरम्यान वाहणाऱ्या वैतरणा खाडीमध्ये वाढीव बेट वसले आहे. वाढीव वैतीपाड्यातील ३०८ घरांमधून २ हजार २०० लोक इथे राहतात. शेती व रेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावाची सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची असून जि. प. च्या १७ गावे करवाळे पाणी पुरवठा योजनेतून या गावाला पाणी पुरवठा केला जातो, मात्र पाण्याची लाईन रेल्वेच्या हादऱ्याने सतत नादुरूस्त होत असल्याने महिलांना डोक्यावर हंडे घेऊन रेल्वे ट्रॅकमधून जीवघेणा प्रवास करीत पाणी आणावे लागते. यावेळी अनेक महिलांना अपघात होऊन त्यांचा मृत्यू ओढवल्याचेही पुढे आले आहे, तसेच आठवडा - पंधरवड्यातून एकदाच वैद्यकीय अधिकारी गावात येत असल्याने एखादा रूग्ण आजारी पडल्यास त्याला बोटीतून अथवा डोलीद्वारे सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा खाजगी रूग्णालयात न्यावे लागत असल्याचे प्रफु ल्ल भोईर यांनी सांगितले.
जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या या वाढीव गावाला आजपर्यंत समस्येव्यतिरिक्त काहीही पदरी पडलेले नाही. मागच्या शुक्रवारपासून या गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी सफाळे कार्यालयाकडे अनेक वेळा कळविले असल्याचे प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले. या गावात १ ली ते ७ वी इयत्तेत ८२ विद्यार्थी शिक्षण घेत असून ८ वी ते १० वीच्या शिक्षणासह महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी १५० च्या आसपास विद्यार्थ्यांना पहाटे उठून वैतरणा, पालघर, विरार या भागातील शाळा कॉलेजमध्ये जावे लागते.
व्यवसायानिमित्ताने रेल्वे पकडण्यासाठी वैतरणा स्टेशनला जाणारा कामगारवर्गही मोठा असून विषारी साप, विंचू यांचा मोठा वावर या भागात असल्याने जीव मुठीत धरून विद्यार्थी, प्रवाशांना पहाटे प्रवास करावा लागत आहे. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गावात उधाणाचे पाणी घरात शिरुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: The Island of Separation in the Black Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.