आयआरबीचे बँक खाते केले सील
By Admin | Updated: March 25, 2016 00:31 IST2016-03-25T00:31:51+5:302016-03-25T00:31:51+5:30
महसूल खात्याने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून ५ कोटी ४० हजार रुपयांच्या गौण खनिज वसुलीसाठी वसईच्या तहसीलदारांनी आयआरबीचे बँक खाते सील केले आहे.

आयआरबीचे बँक खाते केले सील
वसई : महसूल खात्याने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून ५ कोटी ४० हजार रुपयांच्या गौण खनिज वसुलीसाठी वसईच्या तहसीलदारांनी आयआरबीचे बँक खाते सील केले आहे. यंदा महसूल खात्याने ९२ टक्क्यांहून अधिक वसुली करून विक्रम केला आहे.
चालू आर्थिक वर्षात महसूल खात्याला ८२ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. बुधवारपर्यंत तहसील कार्यालयाने ७५ कोटी ५९ लाख ९३ हजार रुपयांची वसुली केली आहे. त्यात जमीन महसूलपोटी ३० कोटी, पालिकेकडील उपकरापोटी ८ कोटी ३१ लाख, गौण खनिज २४ कोटी ९९ लाख आणि करमणूककरापोटी १५ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे मातीभराव केल्याप्रकरणी पालिकेला २६ कोटी २७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी पालिकेकडून अवघे २ कोटी ४३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
आयआरबीने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ससुनवघर, सोपाराफाटा आणि शिरसाडफाटा या ठिकाणी तीन उड्डाणपूल बांधले आहेत. त्यासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाची रॉयल्टी भरलेली नाही. त्यामुळे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी पुलांचे मोजमाप घेऊन आयआरबीला ५ कोटी ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. अनेक नोटिसा बजावूनही आयआरबीने दंड न भरल्याने कंपनीचे तामतलाव येथील बँक आॅफ इंडियात असलेले खाते सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पाटोळे यांनी दिली. (प्रतिनिधी)