महागाईमुळे फटाके विक्रीवर परिणाम
By Admin | Updated: October 24, 2014 00:19 IST2014-10-23T23:24:01+5:302014-10-24T00:19:04+5:30
: किंमतीत झालेली वाढ, आर्थिक मंदी, ध्वनी प्रदुषणाबाबत झालेली जागृती. या अनेक कारणामुळे फटाके दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

महागाईमुळे फटाके विक्रीवर परिणाम
पनवेल : किंमतीत झालेली वाढ, आर्थिक मंदी, ध्वनी प्रदुषणाबाबत झालेली जागृती. या अनेक कारणामुळे फटाके दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पनवेल परिसरात होलसेल विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक विक्रेत्यांचा पन्नास टक्के माल तसाच पडून असल्याने फाटके मार्केटमध्ये अवकळा पसरल्याचे दिसून आले.
फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी उत्तम संधी म्हणजे दिवाळी म्हणून आनंदाचा उत्सव असलेल्या या सणाचे बच्चे कंपनी वाट पाहत असतात. दिवाळीच्या अगोदरच लहानगे फटाके विकत घेण्यासाठी कोणी आई -वडिलांकडे, कोणी काका आणि मामाकडे हट्ट करतात. त्यामुळे बाजारात चार पाच दिवस अगोदरच फटाके खरेदीसाठी मोठी गर्दी होते. पनवेल व सिडको वसाहतीत सुरक्षिततेच्या दुष्टीने एक सुरक्षित जागा निवडूण तेथे स्टॉल टाकण्यात येतात. यंदा निवडणुकीची धामधुम असल्याने उशीरा स्टॉल उभारण्यात आले होते.
पनवेलचे विक्रेते शिवकाशी, तामिखेळनाडू येथून माल आणतात. यंदा १० ते १५ टक्क्यांनी फटाक्यांच्या किंमती वाढल्या आहेत. दरवर्षी फॅमिल पॅकला विशेष मागणी असते मात्र यंदा त्याकडे पाठ फिरवण्यात आली आहे.पाऊस , चक्री, फुलबाजे, बॉम्ब, रॅकेट लंवगी, अशा प्रकारांची सर्वसाधारण जागा मागणी असल्याने या फटक्यांची जादा आॅर्डर दिली जाते. परंतु ही मागणी दरवर्षापेक्षा ५०टक्क्याने कमी असल्याची माहिती होलेसेल विक्रेते सदानंद पाटील यांनी दिली. आमची दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन दुकान असून माल जास्त आणला आहे. मात्र ग्राहकच नसल्याने हा माल ठेवायचा कुठे असा प्रश्न पडला असल्याचे पाटील म्हणाले.
चायना बनावटीचे फटाकेही बाजारात उपलब्ध आहेत मात्र ते देशी बनवटीपेक्षा जास्त धोकादायक असल्याने गेल्या एक दोन वर्षापासून ते ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वर्षी तर चायना सोडा स्वदेशी बनावटीचा मालाची विक्री झाली नसल्याचे दिनेश पाटील या विक्रेत्याने लोकमतला सांगितले.दिवाळीत पनवेलमध्ये फटाक्याच्या खरेदी विक्रीत सुमारे ७ ते ८ कोटी रूपये उलाढाल होते यंदा ती चार कोटीवर स्थिरावण्याची चिन्ह दिसू लागले असल्याचे एका मोठया व्यापाऱ्याने सांगितले. यावेळी किंमतीतही कमालीची वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला न परवडणारी बाब झाली आहे.त्यामुळे अनेकांनी मुलांची समजूत काढून अतिशय कमी फटाके खरेदी केले असल्याचे कळंबोलीतील होलसेल विक्रेते संतोष घरत म्हणाले.
प्रदुषणमुक्त दिवाळी ही संकल्पना गेल्या काही दिवसापासून सोशल मिडियावर अधिक गाजत आहे. अनेक सामाजिक संस्थानी फटके विरहीत दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती केली. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देऊन त्याचे दुष्परीणामाची जाणीवर करून देण्यात आली. त्याचाही फरक यावेळी फटका खरेदीवर पडला असून विद्यार्थी व पालकांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेही फटक्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसते. (वार्ताहर)