प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूका अटळ

By Admin | Updated: May 3, 2017 05:12 IST2017-05-03T05:12:31+5:302017-05-03T05:12:31+5:30

अपात्र ठरलेल्या पाच नगरसेवकांच्या प्रभागात घोषित झालेली पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जव्हार प्रतिष्ठानने घेतल्याने

Inelastic due to establishment | प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूका अटळ

प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूका अटळ

हुसेन मेमन / जव्हार
अपात्र ठरलेल्या पाच नगरसेवकांच्या प्रभागात घोषित झालेली पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जव्हार प्रतिष्ठानने घेतल्याने इतर पक्षांनी तिच्यावर बहिष्कार टाकला तरी ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. जव्हारमध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन या निवडणूकीवर बहिष्कार टाकून एकही उमेदवार न उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व याला गावकऱ्यांनीही पाठींबा देण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. परंतु जव्हार प्रतिष्ठान संस्थेकडून मात्र निवडणूकीची जय्यत तयारी सुरू असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक विविध पक्षांनी जरी नाही लढविली तरी अपक्ष आणि प्रतिष्ठानचे उमेदवार ती लढवतील असाच रंग आहे.
जव्हार प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष भरत पांडुरंग पाटील हे गेल्या काही दिवसांपासुन जव्हार येथेच ठाण मांडून बसलेले असल्याने, त्यांचे कार्यकर्तेही या निवडणूकीकरीता एकवटलेले दिसतात. तसेच गेल्या काही वर्षापासुन जव्हार तालुक्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध रोजगार उपयोगी मोफत उपक्रम राबविले जात असल्याने त्याचा प्रभाव आहे.
येत्या सहा महिन्यातच पुन्हा पंचवार्षिक निवडणूका होणार असल्यामुळे अल्प कालावधीसाठी नगर परिषदेचे पर्यायाने जनतेचे पैसे या निवडणूक प्रक्रियेसाठी खर्च होणार आहेत. नगर परिषदचे हे शताब्दी वर्ष असून हा निधी त्यासाठी वापरता येऊ शकेल अथवा विकास कामांसाठीही त्याचा उपयोग होईल. जव्हारच्या हिताच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे तरीही जव्हार प्रतिष्ठानकडून त्या लढविण्याची सज्जता होत असल्याने जव्हारकर संभ्रमात सापडले आहेत. राजकारणाच्या साठमारीत एकीकडे आड तर दुसरीकडे विहिर अशी गत सध्या जव्हारकरांची झालेली आहे.

वास्तवात काय घडेल?
शहराच्या दृष्टीने या पोटनिवडणुका टळाव्यात यासाठी सर्वपक्षिय नेते जव्हार प्रतिष्ठानच्या नेत्यांची मनधरणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर ती सफल झाली तर पोटनिवडणुकांवरील बहिष्कार कायम राहिल व त्या होणार नाहीत अशीही चर्चा सुरु आहे. परंतु प्रत्यक्षात काय घडेल? ते लवकरच कळेल.

Web Title: Inelastic due to establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.