वाढवण बंदराला विरोध वाढला!
By Admin | Updated: October 1, 2015 01:36 IST2015-10-01T01:36:07+5:302015-10-01T01:36:07+5:30
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसोबत सर्व मच्छीमार संघटना, आदिवासी संघटना, पर्यावरणवादी संघटना सोबतच सर्व राजकीय पक्ष वाढवण बंदराला एकत्रीतपणे विरोध

वाढवण बंदराला विरोध वाढला!
डहाणू : वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसोबत सर्व मच्छीमार संघटना, आदिवासी संघटना, पर्यावरणवादी संघटना सोबतच सर्व राजकीय पक्ष वाढवण बंदराला एकत्रीतपणे विरोध करून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी २ आॅक्टोबरला गांधी जयंती दिनी वाढवण बंदराच्या नियोजित ठिकाणी भव्य निषेध सभा आयोजित केल्याची माहिती वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी दिली.
तब्बल १८ वर्षानी पुन्हा युती सरकार सत्तेवर येताच पुन्हा रद्द झालेल्या बंदराच्या ठिकाणीच समुद्रात ४.५ किलोमिटर अंतरावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मार्फत केंद्र सरकार अणि राज्यसरकार बांधणार आहे. हे बंदर झाल्यास येथील तिवरांच्या (मॅनग्रोव्हज) लाखो झाडांची कत्तल होणार असून पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. मच्छीमार पूर्णपणे नामशेष होणार असून हजारो कूटूंबावर उपासमारीची पाळी येणार आहे.
येथील माशांचे बीजोत्पादनाचे खडक नाहीसे होवून अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होणार आहेत. रस्ते आणि रेल्वेसाठी एक हजार हेक्टर जमीन लागणार असल्याने शेतकरीवर्ग देशोधडीला लागणार आहे.
(वार्ताहर)
----------------
अठरा वर्षापुर्वी रद्द केलेले बंदर पुन्हा उभारण्याचा घाट सरकारने घातला असून ते रद्द करण्यासाठी संघर्ष समितीने अनेक प्रयत्न करून पाहिले मात्र सरकारने त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आणि बंदर बांधण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. केंद्रसरकारच्या या हट्टी धोरणाचा निषेध करण्यासाठी बंदर परिसरातील १९ गावांतील तसेच उत्तन ते झाई पर्यंतचे मच्छीमार २ आॅक्टोबरला प्रास्ताविक वाढवण बंदराच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला निषेध व्यक्त करणार आहेत. यात पालघर जिल्ह्णातील सर्व राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, पर्यावरणतज्ञ, आणि सुमारे १० हजार आंदोलक उपस्थित राहणार आहेत असे संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले.