दिव्य वसतिगृहाचे उदघाटन
By Admin | Updated: April 13, 2016 01:54 IST2016-04-13T01:54:28+5:302016-04-13T01:54:28+5:30
पालघर व ठाणे जिल्ह्यातील अशा अंध व मतीमंदांच्या वसतिगृहाचे उद्घाटन इंग्लंडचे खासदार बॉब ब्लॅकमन व त्यांच्या पत्नी निकोला यांच्या हस्ते मोठया थाटात पार पडले.

दिव्य वसतिगृहाचे उदघाटन
जव्हार : पालघर व ठाणे जिल्ह्यातील अशा अंध व मतीमंदांच्या वसतिगृहाचे उद्घाटन इंग्लंडचे खासदार बॉब ब्लॅकमन व त्यांच्या पत्नी निकोला यांच्या हस्ते मोठया थाटात पार पडले. त्यांच्या समवेत युनायटेड किंगडम येथील सेवा इंटरनॅशनलचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या यू. के. येथील सेवा इंटरनॅशनल संस्थेने आजमितीस १०० अंध व मतीमंद मुलांच्या निवासी शाळेसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी भव्य इमारत बांधून दिली. त्याच बरोबर आवश्यक ते सर्व साहित्य व फर्निचर देखील देणगी स्वरुपात दिले.
शासनाची एक रुपयाची मदत न घेता श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व सचिव प्रमिलाताई कोकड यांनी १७ एप्रिल २००७ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या या शाळेला ‘सेवा’ च्या मदतीमुळेच भव्य सुसज्य इमारत लाभल्याचे प्रमिलाताईनी या प्रसंगी सांगितले व तिचे आभार मानले.
जव्हार सारख्या अतिदुर्गम व आदिवासी तालुक्यात मतीमंद मुलांच्या बाबतीत असलेला गैरसमज व दारिद्र्य यामुळे पालकांना या विशेष मुलांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसल्याने मुलांची हेळसांड होत होती ती न पहावल्याने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमिलाताईनी सुरवातीच्या खडतर प्रवासात पदरमोड करून ८ मुलांची निवासी शाळा सुरु केली, नंतरच्या काळात दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या भाड्याच्या, पडक्या खोलीत मुलांचा सुरु झालेला शैक्षणिक, आरोग्य व निवासाचा खडतर प्रवास सुखकर होत गेला.
केवळ निस्वार्थी भावनेने सुरु असलेल्या शाळेबाबत खा. प्रकाश जावडेकर यांना समजल्यावर त्यांनी शाळेस प्रत्यक्ष भेट दिली व तात्काळ संस्थेने अगोदर खरेदी केलेल्या जागेत शाळा बांधणीसाठी खासदार निधीतून पंधरा लाखाचा निधी दिला. परंतु शाळेत शिकणाऱ्या व राहणाऱ्या विद्यार्थांची संख्या वाढल्याने तो निधी पुरेसा नव्हता.
परंतु खचून न जाता प्रमिलाताईनी शासनाच्या मदतीच्या भरवशावर न राहता अनेक ठिकाणी मदतीसाठी पदर पसरले. अखेर यू. के. स्थित भारतीय वंशाचे नागरिक विमल केडिया यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सेवाच्या माध्यमातून एक इमारत बांधून दिली. तिचे उद्घाटन २० जाने. २०१५ मध्ये करण्यात आले व ८ वषार्नंतर मुले हक्काच्या वास्तूत राहायला आली. परंतु तेवढ्या न थांबता सेवाचे पदाधिकारी सतत प्रमिलाताईच्या संपर्कात राहून मुलांसाठी काय हवे नको ते विचारत व मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह असावे व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टींग व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असता ती त्यांनी करून दिली.
पाहुण्यांचे स्वागत आदिवासी तारपा नृत्याने करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी खा. चिंतामण वनगा, भरतभाई वड्कुल, रमेश मेहता, संजय खन्ना, पालघर जि. प. अध्यक्षा सुरेखा थेतले, पं. स. सभापती ज्योती भोये, आदिवासी मोर्चाचे राज्य अध्यक्ष हरी भोये, व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र काळे, सहा. प्र. अधि. प्रदिप देसाई, मुख्याधापिका सुनिता बेलदार या मान्यवरांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.