१ करोड ४७ लाखांचे ड्रग्ज पकडल्याने वसईत खळबळ; २ नायजेरियन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2023 15:01 IST2023-12-30T15:00:35+5:302023-12-30T15:01:03+5:30
अंमली पदार्थ विरोधी पथकाची नालासोपाऱ्यात कारवाई, प्रगतीनगरच्या हायटेन्शन रोडवरुन बसेरा बिल्डींग बाजुकडे येत असताना शिवकृपा बिल्डींगसमोर दोन नायजेरियन हे एकमेकांशी बोलत होते.

१ करोड ४७ लाखांचे ड्रग्ज पकडल्याने वसईत खळबळ; २ नायजेरियन अटकेत
मंगेश कराळे
नालासोपारा :- अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला १ करोड ४७ लाखांचे ड्रग्ज पकडल्याने वसईत खळबळ माजली आहे. या पथकाने नालासोपाऱ्याच्या प्रगती नगर परिसरात शुक्रवारी ही कारवाई करून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतार्थ मिरा-भाईदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थाचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस हवालदार प्रदिप टक्के, महेश पागधरे, सुनिल कुडवे, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, अजय यादव असे पोलीस पथक रवाना झाले होते. गस्ती दरम्यान वसई, आचोळे, तुळींज, मोरेगांव, प्रगतीनगर, ९० फुटी रोड, हायटेन्शन रोड परिसरात शासकीय वाहनातून गस्त करत होते.
प्रगतीनगरच्या हायटेन्शन रोडवरुन बसेरा बिल्डींग बाजुकडे येत असताना शिवकृपा बिल्डींगसमोर दोन नायजेरियन हे एकमेकांशी बोलत होते. एकाच्या पाठीवर सॅक बॅग व दुसऱ्याच्या खांदयावर क्रॉसमध्ये लहान सॅक अडकवलेली असताना मिळुन आले. त्यांचे हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याचेकडे कोणतातरी अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात १ करोड १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ५५४.४ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन व ३६ लाख १२ हजार रुपये किंमतीचे १२०.४ ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकुण १ करोड ४७ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी दिवाईन चुकवूमेका आणि चिकवु फ्रेडिंनंद ओकीतो नवमारी यांच्याविरोधात एनडीपीएस कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस हवालदार प्रदिप टक्के, महेश पागधरे, सुनिल कुडवे, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, अजय यादव यांनी केली आहे.