जखमींवर आता तत्काळ उपचार
By Admin | Updated: September 11, 2014 01:28 IST2014-09-11T01:28:42+5:302014-09-11T01:28:42+5:30
रेल्वेच्या विविध अपघातांत अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. अशा जखमी प्रवाशांसाठी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही

जखमींवर आता तत्काळ उपचार
मुंबई : रेल्वेच्या विविध अपघातांत अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. अशा जखमी प्रवाशांसाठी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही आणि त्यांना मृत्यूलाही सामोरे जावे लागते. मात्र अशा जखमींना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून सरकारी कोट्यातील मध्य रेल्वेच्या अठरा आणि पश्चिम रेल्वेच्या २८ स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र ठाणे आणि विरारपुढील स्थानके या रुग्णवाहिकांपासून वंचित राहिली असून त्या स्थानकांवरही लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली जाणार आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला मोठा अपघात झाला आणि जखमींना नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागला. या घटनेत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागल्याने रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. या अपघाताबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरात असणाऱ्या रेल्वे स्थानकांचीही हीच गत असून अनेक स्थानकांवर रुग्णवाहिका नसल्याने जखमी प्रवाशांना खासगी रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच पंचाईत होत होती. मात्र रेल्वेचे हे टेन्शन निघून गेले असून सरकारकडून रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या आहेत. राज्यभरातील रेल्वे स्थानके, सरकारी रुग्णालये यांच्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच ४०० रुग्णवाहिका विकत घेतल्या. यापैकी १८ रुग्णवाहिका मध्य रेल्वेवरील स्थानकांसाठी तर २८ रुग्णवाहिका पश्चिम रेल्वेवरील स्थानकांसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. (प्रतिनिधी)