बेकायदा होर्डिंग्जचा पालघरमध्ये सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:45 IST2021-03-11T00:45:15+5:302021-03-11T00:45:38+5:30
दुकानदार, वाहनचालकांना हाेत आहे त्रास

बेकायदा होर्डिंग्जचा पालघरमध्ये सुळसुळाट
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर नगर परिषदेने खाजगी जागेत आपले बेकायदा होर्डिंग्ज लावल्याने हजारो रुपये भाडे भरणाऱ्या दुकानदारांचा व्यवसाय ठप्प पडण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पालघर शहरात बेकायदा आणि विनापरवाना होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला असून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर लटकत असलेल्या होर्डिंग्जचा मोठा फटका वाहनचालकांना बसला आहे. ज्याला हव्या त्या पद्धतीने हव्या त्या ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज लावले जात असून एका मॉलच्या शुभारंभाचे बॅनर शहरातील सर्व रस्त्यावर लावले होते. यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्या बेकादा बॅनरवर कारवाईचे सत्र नगर परिषदेने सुरू केले आहे.
माहीम रस्त्यावरील ठाणे जिल्हा समाज संघाच्या इमारतीखाली असलेल्या साडी सेंटर आणि अन्य कपड्याच्या दुकानदारांनी दुकानांसमोर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्प्ले लावले आहेत., मात्र पालघर नगर परिषदेने ठाणे जिल्हा समाज संघाची कुठलीही परवानगी न घेता त्यांच्या प्रवेशद्वाराजवळील लोखंडी कठड्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धा आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ चे दोन भले मोठे होर्डिंग्ज काही दिवसांपासून लावून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या ग्राहकांना आमची दुकानेच दिसत नसल्याने आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे दुकानदारांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देत बेकायदा लावलेले होर्डिंग्ज काढून टाकावेत, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.
अशी बॅनर लावली असतील तर ती काढण्यासाठी मी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत.
- स्वाती देशपांडे, मुख्याधिकारी