जव्हार जिल्हा निर्मितीचे कागदी घोडे हलू लागले
By Admin | Updated: August 18, 2015 00:20 IST2015-08-18T00:20:39+5:302015-08-18T00:20:39+5:30
राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा

जव्हार जिल्हा निर्मितीचे कागदी घोडे हलू लागले
वसई : राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाच्या चर्चेला वेग आला आहे. या मध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार हा भाग वेगळाकरून हा नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना विचाराधीन आहे, अशी माहिती आहे.
अजून तरी हे सर्व कागदी घोड्यांच्याच स्वरुपात असले तरी, त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा आततायीपणाचा प्रकार असल्याचे सांगितले तर काही संस्था व उद्योजकांनी युती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या प्रस्तावानुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार वेगळे करून नवीन जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव असून या संदर्भात राज्य सरकार आमदारांचे मनोगत जाणून घेत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला.
त्यावेळी अनेक नागरीकांनी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे डोंगरी, सागरी, व नागरी असे तीन जिल्हे करण्यात यावेत अशी मागणी केली होती. परंतु तत्कालीन आघाडी सरकारने या मागणीचा विचार न करता सरसकट विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण केला. (प्रतिनिधी)