शेकडो इमारती तहानलेल्या! पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:41 IST2020-02-16T23:41:13+5:302020-02-16T23:41:23+5:30
नालासोपारावासीयांना घ्यावे लागते विकतचे पाणी : पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही

शेकडो इमारती तहानलेल्या! पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही
मंगेश कराळे
नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेकडून मुबलक पाणी असल्याचा दावा केला जात असताना नालासोपारा परिसरातील शेकडो इमारती आजही तहानलेल्या आहेत. पाण्यासाठी त्यांना महिन्याला हजारो रुपये खर्च करून आपली तहान भागवावी लागत आहे. विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने या परिसरात टँकरमाफियाही आपले पाय रोवत आहेत. या परिसरात पाण्यासाठी टँकर माफिया एका टँकरला एक हजार रुपये ते बाराशे रुपये आकारतात.
नालासोपारातील पूर्व आणि पश्चिमेकडील परिसरात शेकडो इमारती गेल्या १० ते १२ वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. या इमारती वसवताना महापालिकेने कानाडोळा केला. आता या इमारतींमध्ये लाखो रुपये खर्च करून अनेकांनी घरे घेतली, तर महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विकासकांनी दिले. पण आता अनेक वर्षांचा काळ उलटला; परंतु अनेक इमारतीला महापालिकेची नळजोडणी मिळालेली नाही. उलट त्यांना टँकरने पाणीपुरवठा करून विकासक आणि टँकरमाफिया यांनी मोठी माया जमवली आहे.
वसई आणि विरार शहरापेक्षा नालासोपारा शहरातील मतदारांची संख्या जास्त आहे. पण प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाण्याचे आश्वासन देऊन मते पदरात पडून घेण्याचे काम राजकीय पुढारी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पाण्यावरच राजकारण करीत सत्ताधारी पक्ष सत्ता गाजवत आहे. पूर्वेकडील परिसर अधिक लोकवस्तीचा असून येथील नागरिक आजही आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवत आहेत. टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य नसल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न सतावत आहे. असे असतानाही महापालिका या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करीत नाही. काही ठिकाणी सार्वजनिक पाण्याचे नळ आहेत, पण त्यांना पाणी येत नाही, अशी स्थिती आहे.
पाण्याच्या बाबतीत कोणतेही राजकारण कुणी करू नये. नळ कनेक्शन देताना कोणी त्रास देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर रहिवाशांनी माझ्याशी किंवा आमदारांशी संपर्क साधावा. सर्वांना पाणी मिळावे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकारांना थारा
देणार नाही.
- प्रवीण शेट्टी, महापौर,
वसई-विरार महानगरपालिका