होळीलाही महागाईचे चटके !
By Admin | Updated: March 17, 2016 02:37 IST2016-03-17T02:37:45+5:302016-03-17T02:37:45+5:30
होळी आणि धुळवड हा विक्रमगड तालुक्यातील आदिवासी समाजाचा पारंपारिक व जिव्हाळ्याचा सण. मात्र यंदा तालुक्यातील बाजारात चीज वस्तू खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या

होळीलाही महागाईचे चटके !
- राहुल वाडेकर, तलवाडा
होळी आणि धुळवड हा विक्रमगड तालुक्यातील आदिवासी समाजाचा पारंपारिक व जिव्हाळ्याचा सण. मात्र यंदा तालुक्यातील बाजारात चीज वस्तू खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या खेड्यापाड्यातील ग्राहकांना महागाईचे चटके बसू लागले आहेत. पिचकारी, रंग, गूळ, चणाडाळ या होळीच्या सणांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या भावामध्ये दुपटीने वाढ झाल्याने सण कसा साजरा करावा? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाने दगा दिला असल्याने येथील आदिवासी बांधवावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. येथे कोणतेही मोठे उद्योग, कारखाने नसल्याने रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. त्यातच यंदा रेती व्यवसायास अतिरिक्त परवानगीची गरज असल्याने त्यावर मिळणारी मजुरीही बंद आहे़ एकंदरच खिशात पैसे नाहीत आणि सण तोंडावर आहे. एकीकडे लेकर पिचकाऱ्या, रंग उडविणाऱ्या बंदूका मागत आहेत, तर दुसरीकडे तोकड्या कमाईवर घरातील सामान सुमानाची खरेदी कशी करायची अशी विवंचना कासाठवाडी येथे राहाणारे तुळशिराम चौधरी व सारशी येथील जयराम भावर यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली आहे़ विक्रमगडशहरात तालुक्यातील ९४ गावातील लोक दररोज जीवनाश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी येतात हे विशेष!