महामार्ग पोलीसांकडून पिळवणूक
By Admin | Updated: March 1, 2016 02:00 IST2016-03-01T02:00:20+5:302016-03-01T02:00:20+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी, खानीवडे टोलनाक्यांवर, धानीवरी चढणीवर महामार्ग वाहतूक पोलीसांकडून पहाटे अथवा रात्रीच्या वेळी अवजड वाहनाची अडवणूक केली जाते आहे

महामार्ग पोलीसांकडून पिळवणूक
डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी, खानीवडे टोलनाक्यांवर, धानीवरी चढणीवर महामार्ग वाहतूक पोलीसांकडून पहाटे अथवा रात्रीच्या वेळी अवजड वाहनाची अडवणूक केली जाते आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पैसे गोळा करण्यात दंग असलेले हेच वाहतूक पोलीस महामार्गावर अपघात घडल्यास मात्र वेळेत पोहोचत नसल्याचा आरोपही वाहतूकदारांनी केला आहे. खरे तर गुजरातहुन महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची दापचरी सीमा तपासणी नाक्यावर अत्याधुनिक पद्धतीने तपासणी केली जाते. त्यामुळे पुन्हा काही अंतरावर. वाहतूक पोलीसांनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. ही तपासणी नसून नाहक अडवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबई अहमदाबाद हायवेवर गुजरातहून तसेच दादरा नगर हवेली येथून मुंबईला जाण्यासाठी तसेच सुट्टीच्या कालावधीत गावी जाऊ इच्छिणाऱ्या हायवेने जावे लागते. परगावाहून आलेले प्रवासीही उतरून हायवेने मिळेल त्या वाहनाने इच्छीत स्थळी जात असतात. वाहनांना अडवून ठराविक रकमेची मागणी महामार्ग पोलीस करीत असल्याचे एका वाहनचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगीतले. अवाजवी रक्कम मागितली जाण्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत असून कुटुंबकबिल्यासह रात्रीअपरात्री तिष्ठत उभे राहण्यापेक्षा मागितली ती रक्कम देऊन इच्छित स्थळी जाणे भाग पडत असल्याच्या तक्रारी वाहनचालक करीत आहेत.