- रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील खोडाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तरीही येथील आरोग्य सेवा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. ६ महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासी रु ग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित आणि कायमस्वरूपी नियुक्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खोडाळा ग्रामपंचायतीने दिला आहे.खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात परिसरातील २८ खेडी समाविष्ट होतात. यांसह नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, देवगाव, टाके आणि श्रीघाट आदी परिसरातूनही या केंद्राकडे रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणावर असतो. यामध्ये बाह्यरुग्ण २०० ते २५० च्या पटीत दररोज तपासले जातात. तर आंतररूग्णांचा भरणाही लक्षणीय आहे.परंतु येथील श्रेणी १ चे वैद्यकीय अधिकारी पद तीन वर्षांपासून तर श्रेणी २ चे पद ६ महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसतो.खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रु ग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन येथे बºयाच वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात आहे. या मागणीला आजपर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उलट येथील रुग्णांना प्राथमिक सेवाही सुरळीत मिळत नसल्याने रुग्णांमध्ये संताप आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊशकला नाही.याबाबत आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. वेळीच दखल घेतली नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू.- प्रभाकर पाटील, सरपंच, खोडाळा
खोडाळ्यातील आरोग्य सेवा कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:35 IST