वसईत तीन इमारतींवर हातोडा
By Admin | Updated: March 4, 2016 01:28 IST2016-03-04T01:28:42+5:302016-03-04T01:28:42+5:30
सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौदा बेकायदा इमारती जमिनदोस्त करण्याची कारवाई महसूल विभागाने वसई विरार महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने आजपासून सुुरु केली.

वसईत तीन इमारतींवर हातोडा
वसई : सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौदा बेकायदा इमारती जमिनदोस्त करण्याची कारवाई महसूल विभागाने वसई विरार महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने आजपासून सुुरु केली. संध्याकाळपर्यंत चार मजली तीन इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या. याठिकाणी असलेल्या दहा इमारतींमध्ये मिळून तब्बल पाचशे कुटुंबे रहात असून एैन परिक्षेच्या मौसमात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
विरार पूर्वेकडील कारगिर नगर परिसरात सरकारी जमिनीवर अनेक बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी बारा इमारती सर्व्हे क्रमांक १६२ मधील असून ही जमीन महसूल खात्याची आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर कोर्टाने सर्व इमारती जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. येथील रहिवाशांना मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची संकट आले आहे. पालघरचे जिल्हधिकारी अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून कारवाईला सुरुवात झाली. सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव, नायब तहसिलदार प्रदीप मुकणे, डीवायएसपी नरसिंग भोसले, पोलीस निरीक्षक सुनिल माने यांच्या उपस्थितीत किमान तीनशेहून अधिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई सुरु करण्यात आली असून येत्या २३ तारखेपर्यंत सर्व इमारती जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.