पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळच नाही
By Admin | Updated: September 3, 2015 02:44 IST2015-09-03T02:44:45+5:302015-09-03T02:44:45+5:30
पालघर नावापुरताच जिल्हा झाला, मात्र अजून कुठलेही व्हिजन नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळच नाही
पालघर : पालघर नावापुरताच जिल्हा झाला, मात्र अजून कुठलेही व्हिजन नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे. पालघरच्या विकासासाठी आमच्या पालकमंत्र्यांना वेळच मिळत नसल्याची खंत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे व्यक्त केली.
ते म्हणाले की, वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे औत्सुक्य राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले होते. या निवडणुकीत सर्व जातीधर्माच्या, विविध स्तरावरील उमेदवारांना उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आम्ही एकहाती सत्ता मिळवू शकलो. पालघरमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे आम्ही दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. पालघरची पोट निवडणूक जिंकायची असेल तर नको ती आश्वासने देत मतदारांची फसवणूक करणारा कार्यकर्ता मला नको तर वास्तविकतेचे भान ठेवून स्वत:ला कार्यात झोकून देणारा कार्यकर्ता हवा. नवनिर्मित पालघर जिल्ह्णाच्या समस्यांबाबत किती दिवस ओरडत बसाल त्यापेक्षा उपलब्ध परिस्थितीशी सामना करून पुढे जायला हवे. पालघरच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विकासात्मक कामे मतदारापर्यंत पोहचवली तर आपल्याला यश नक्कीच मिळेल असा विश्वास माजी महापौर राजीव पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी पालघरच्या विठ्ठल रखुमाई सभागृहात पार पडली. यावेळी माजी महापौर राजीव पाटील, आ. विलास तरे, ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, माजी आ. मनिषा निमकर, प्रविण राऊत, सुभाष तामोरे, प्रशांत पाटील, सुरेश तरे इ. मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात बविआच्या पदाधिकाऱ्यांची निवड व पालघर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी सर्व वरिष्ठांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात
इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी बविआत प्रवेश केला.
(वार्ताहर)