वाढवण आंदोलकांना युतीने सोडले वाऱ्यावर
By Admin | Updated: September 1, 2015 04:26 IST2015-09-01T04:26:17+5:302015-09-01T04:26:17+5:30
वाढवण बंदराच्या उभारणीचा सर्वाधिक फटका मच्छीमार, बागायतदार, डायमेकिंग व्यवसायाला बसणार असून येथील हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत

वाढवण आंदोलकांना युतीने सोडले वाऱ्यावर
पालघर : वाढवण बंदराच्या उभारणीचा सर्वाधिक फटका मच्छीमार, बागायतदार, डायमेकिंग व्यवसायाला बसणार असून येथील हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्या विरोधात उभारण्यात येणाऱ्या स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्ष, मच्छीमार संघटना, आदिवासी संघटनांनी रविवारी एकत्र येऊन नियोजित बंदराला विरोध करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, सेना-भाजपा पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
केंद्रातील भाजपा सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच, असे जाहीर केले आहे. तर, स्थानिक सेना आणि भाजपा आमदार, संपर्कप्रमुख तरे यांनी मात्र आम्ही वाढवण बंदराच्या विरोधात असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्या भूमिकेबाबत लोकांमध्ये संशय आहे. मात्र, या बंदराबाबत रविवारी पालघरच्या विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीत आ. आनंद ठाकूर, आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी आ. मनीषा निमकर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, भूमी सेनेचे काळुराम धोंदडे, बविआचे ज्येष्ठ नेते प्रवीण राऊत, बंदर संघर्ष समिती अध्यक्ष नारायण पाटील, पौर्णिमा मेहेर, नारायण विंदे, केदार काळे, अनिल गावड, प्रकाश राऊत आदी मान्यवरांचा सहभाग होता. त्यांनी या बंदराविरोधात संघर्ष करणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)