अपघातविरहित आगार म्हणून पालघरची ओळख निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 22:39 IST2020-01-11T22:39:45+5:302020-01-11T22:39:59+5:30
सुरक्षितता मोहीम । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

अपघातविरहित आगार म्हणून पालघरची ओळख निर्माण करा
पालघर : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ब्रीदवाक्याला बांधील राहात प्रवाशांशी जोडलेल्या नात्यांची जपवणूक करा. आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रवाशांची काळजी घेत अपघातविरहीत आगार म्हणून पालघरची ओळख निर्माण करा, असा सल्ला सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद ऊर्फ बाबा कदम यांनी सुरक्षितता मोहिमेत कर्मचाऱ्यांना दिला.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरु वातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येत असते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत ११ ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पालघर आगारात आयोजित कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून विभाग नियंत्रक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दांडेकर, विवा. नियंत्रक आशीष चौधरी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हितेन नाईक, ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील, व्यवस्थापक चव्हाण, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक वर्तक, पद्माकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघर विभागांतर्गत असलेल्या ८ आगारांतून दैनंदिन ४२५ बसेसमधून ३ हजार ३७४ फेऱ्यांद्वारे १ लाख ४३ हजार कि.मी.चा प्रवास पार केला जातो. ६३३ नवीन चालक-वाहक भरती करून शिवशाही आदी आरामदायी बसेसची सेवा सुरू केल्या आहेत. पालघर विभाग प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असून आपल्या वागण्याने एसटी विभागाच्या उद्देशाला कुठेही डाग लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन नियंत्रक गायकवाड यांनी केले. आता चालक-वाहकांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत शिरून काम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही केले.
अपघातवाढ चिंताजनक
या वर्षभरात अपघाताच्या प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक असून तणाव विरहित वातावरणात एसटी चालवा, असेही शेवटी गायकवाड यांनी सांगितले. या वेळी सुधीर दांडेकर, अशोक वर्तक, पीएम पाटील यांनी आपले विचार मांडले.