महागाईची झळ सोसूनही गणेशोत्सव उत्साहात
By Admin | Updated: September 19, 2015 21:52 IST2015-09-19T21:52:56+5:302015-09-19T21:52:56+5:30
यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांना महागाईचे चांगलेच चटके बसले. साध्या झेंडुच्या फुलापासून थेट मखरापर्यंत चढ्या भावाने साहित्य खरेदी करावे लागले. फुलाच्या दरामध्ये मनमानीपणे वाढ

महागाईची झळ सोसूनही गणेशोत्सव उत्साहात
- दिपक मोहिते, वसई
यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांना महागाईचे चांगलेच चटके बसले. साध्या झेंडुच्या फुलापासून थेट मखरापर्यंत चढ्या भावाने साहित्य खरेदी करावे लागले. फुलाच्या दरामध्ये मनमानीपणे वाढ करण्यात आल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. पूर्वी ५ रू. ला झेंडू फुलाचा वाटा मिळत होता तो आता १५ ते २० रू. वर पोहोचला आहे. दर वाढवल्यानंतरही वाट्यातील फुलाचे नग संख्येने कमी झाले आहेत.
यंदा फुले, दुर्वा, हार, आंब्याची पाने इ. वस्तू खरेदी करताना गणेशभक्तांना अक्षरश: घाम फुटला. १५ रू. ला मिळणारा झेंडूच्या फुलांचा हार २५ ते ३० रू. ला खरेदी करावा लागत होता. तर १०८ दुर्वांसाठी २० रू. खर्ची पडत होते. पूर्वी ६० ते ७० रू. ला खरेदी करण्यात येणारी कंठी आता १५० रू. ला घ्यावी लागत आहे. मखराचे दरही ३०० ते ४०० रू. ने यंदा वाढले आहेत. तर आरासाचे इतर साहित्यही २० ते २५ टक्क्यांनी महागले आहे. तरीही खरेदी-विक्री व्यवहार मात्र अगदी जोशात झाले. गेल्या ८ दिवसात वसई-विरार, नालासोपारा शहरामध्ये कोट्यावधी रू. ची आर्थिक उलाढाल झाली. पदपथावर झेंडुची फुले व हार विकणाऱ्या महिला विक्रेत्यांनीही यंदा बऱ्यापैकी व्यवसाय केला. फळांच्या किंमतीही वाढल्या आहेत. महागाईची झळ बसूनही गणेशभक्तांनी बऱ्यापैकी खरेदी केली. ग्रामीण भागातील आदिवासी समाजाही पारंपारीक पद्धतीने गणेशोत्सव व गौरीपूजन साजरा करत आहे. त्यामुळे विक्रेत्यांची चंगळ आहे.