मिरारोड - भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत असताना, शॉक लागून प्रतीक शाह (वय 34) या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यास वाचवण्यात यश आले आहे.
भाईंदर पश्चिमेच्या मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष आहे त्यामुळे सदर मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि धामधूमित गणेशोत्सव साजरा केला. मंडळाने मोदी पटेल मार्ग व मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली होती. झाडांवर विद्युत रोषणाई व विजेच्या केबल, तारा टाकल्या होत्या. मंडळाने नंतर झाडांच्या फांद्यावर असलेली विजेची तोरणे काढून तारा बांधून त्यावर विजेच्या तोरणमाळा लावल्या होत्या.
आज शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढली. मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी पटेल रस्त्याच्या नाक्यावर झाडास व अन्यत्र हात लागला असता प्रतीक शाह या कार्यकर्त्यास विजेचा जबर शॉक लागून तो तिकडेच चिकटला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कार्यकर्ता गेला असता तो सुद्धा त्याला चिकटला. त्यावेळी अन्य लोकांनी प्रसंगावधान ठेवून बांबूने दुसऱ्या कार्यकर्त्यास बाजूला केले. त्यानंतर प्रतीक याला बाजूला केले मात्र तो जागीच मरण पावला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतीक शाह हे भाईंदरच्या वसंत वैभव इमारतीत रहात होते. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. अनंत चतुर्दशी असल्याने प्रतीक हे पत्नीसह दर्शनास आले. त्यांनी आरती केली. विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढून ती ट्रॉली वर ठेवली. त्या नंतर शॉक लागण्याची घटना घडली. या घटने प्रकरणी भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अदानी वीज कंपनी आणि महापालिका अधिकाऱ्यांवर पुन्हा दाखल करण्याची मागणी गणेशोत्सव काळात पावसाची दमदार हजेरी आहे. तसे असताना शहरात ठिकठिकाणी झाडांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा विद्युत रोषणाई केली आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करता येत नसताना देखील उत्सवाच्या सुरवाती पासूनच सदर विद्युत रोषणाई विरोधात महापालिकेकडे तक्रारी होऊन देखील महापालिकेने गांभीर्याने घेतले नाही अदानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील या झाडांवरील तसेच तारा बांधून उघड्यावर केलेल्या रोषणाईबद्दल कळविण्यात आले होते. पावसात शॉक लागून जीवित हानी होऊ शकते याची महापालिका अधिकारी व अदानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली गेली होती. मात्र त्यांनी कोणीही गांभीर्याने पाहिले नाही आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचाच बळी हा प्रतीक शाह ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिका अधिकारी व अदानी वीज कंपनीचे अधिकारी यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधचा पुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.