सफाई कामगारांना दिल्यात मोफत सदनिका

By Admin | Updated: August 16, 2015 23:10 IST2015-08-16T23:10:55+5:302015-08-16T23:10:55+5:30

पालिकेत २५ वर्षे सेवा देणाऱ्या सफाई कामगारांसाठी मोफत घरांची योजना राज्य शासनाने २००८ मध्ये सुरू केल्यानंतर ८ वर्षांनी पालिकेतील पात्र ६८ सफाई

Free room for cleaning workers | सफाई कामगारांना दिल्यात मोफत सदनिका

सफाई कामगारांना दिल्यात मोफत सदनिका

भार्इंदर : पालिकेत २५ वर्षे सेवा देणाऱ्या सफाई कामगारांसाठी मोफत घरांची योजना राज्य शासनाने २००८ मध्ये सुरू केल्यानंतर ८ वर्षांनी पालिकेतील पात्र ६८ सफाई कामगारांना मोफत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्याचा सोहळा शनिवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापौर गीता जैन यांच्या हस्ते पार पडला. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे हे घडून आले.
या वेळी आ. नरेंद्र मेहता, आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शासनाने २००८ मध्ये राज्यातील पालिकांत २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेंतर्गत मोफत घरे देण्याचा अध्यादेश काढला आहे. ही योजना राबविण्यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने ११ फेब्रुवारी २०१० च्या महासभेत प्रस्ताव मंजूर करून घेतला. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रशासनाने तो १ मार्च २०१४ रोजी जिल्हा समाजकल्याण विभागाकडे पाठविला होता. जिल्हा समाजकल्याण विभागाने तो प्रस्ताव जिल्हा नगरपालिका विभागाकडे मान्यतेसाठी पाठविल्यानंतर त्यात काही तांत्रिक त्रुटी काढल्या. त्याचे निराकरण पालिकेने केल्यानंतर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता.
या योजनेंतर्गत सदनिका उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने मीरा रोड येथील युनिक शांती डेव्हलपर्सचे दिलेश शहा यांना मीरा रोड, पूनम गार्डन हे गृहसंकुल बांधण्यास परवानगी दिली. त्यातून पालिकेला प्राप्त झालेल्या नागरी सुविधा भूखंडावर ही योजना राबविण्याचे प्रशासनाने ठरविले. त्या भूखंडावर प्रत्येकी २७० चौ. फुटांच्या ७० सदनिका विकासकाने पालिकेला दिल्या आहेत.
परंतु, पालिकेच्या प्रस्तावाला योग्य पाठपुराव्याअभावी जिल्हा प्रशासनाने मंजुरी न दिल्याने २५ वर्षे सेवा देणारे सफाई कामगार योजनेपासून वंचित राहिल्याचे वृत्त २४ एप्रिल २०१५ च्या लोकमत अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन अधिकारी नंदकुमार बुराडे यांनी २९ एप्रिल २०१५ रोजी आयोजिलेल्या बैठकीत पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
त्यानुसार, पालिकेने एकूण ७३ कामगारांना योजनेसाठी पात्र ठरवून त्यांच्या फेरपडताळणीत दोन जणांना योग्य पुराव्याअभावी अपात्र ठरविण्यात आले आहे. उर्वरित ७० लाभार्थ्यांपैकी सुरुवातीला ६८ कामगारांच्या सदनिकांची सोडत प्रशासनाने गुरुवारी (१३ आॅगस्ट) काढली. (प्रतिनिधी)

Web Title: Free room for cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.