वसई : वसईतून १० फेबु्रवारीला बेपत्ता झालेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह चिंचोटीच्या जंगलात आढळला. महिलेच्या हातातील कागदावरील मोबाइल क्रमांकावरून वालीव पोलिसांनी हत्येचा तपास करीत प्रियकराला ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. वसई पूर्वेकडील वाघरीपाडा येथे राहणारी अनिता नर्मदा (२८) ही विवाहित महिला १० फेब्रुवारीपासून बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली होती. गुरुवारी रात्री चिंचोटीच्या घनदाट जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलांना महिलेचा मृतदेह आढळून आला. याची खबर वालीव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्या महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच मृतदेह बेपत्ता अनिताचा असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. एपीआय राणी पुरी यांनी तपास सुरू केला असता अनिताच्या हातात कागदाचा तुकडा मिळाला. त्यात एक मोबाइल नंबर लिहिलेला होता. त्यावरून पोलिसांनी दिलीप साठल्या (३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिलीपने खुनाची कबुली दिली.सहा तासांत उलगडा... १ अनिताचे लग्न झाले असले तरी नवऱ्याशी पटत नसल्याने ती विभक्त राहत होती. विवाहित अनिताचे दिलीपशी अनैतिक संबंध होते. अनिताने लग्नासाठी दिलीपकडे तगादा लावला होता. पण, लग्न झालेला दिलीप अनिताशी लग्न करायला टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. शेवटी, त्याने अनिताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. २ १० फेब्रुवारीला दिलीपने बहाणा करून अनिताला चिंचोटीच्या जंगलात नेले. घनदाट जंगलात गेल्यानंतर दिलीपने गळा दाबून अनिताची हत्या केली. तसेच मृतदेह झाडाझुडुपांत लपवून ठेवला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत खुनाचा उलगडा करून आरोपीला अटक केली.
चिंचोटीच्या जंगलात नेऊन केली हत्या
By admin | Updated: February 21, 2016 02:30 IST