बिल्डरच्या कार्यालयाचा जबरदस्तीने कब्जा
By Admin | Updated: May 9, 2017 00:18 IST2017-05-09T00:18:29+5:302017-05-09T00:18:29+5:30
एका इमारतीच्या बांधकामातील भागीदारीच्या करारातील अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीसी पाठवल्याचा राग मनात धरून जागृती

बिल्डरच्या कार्यालयाचा जबरदस्तीने कब्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : एका इमारतीच्या बांधकामातील भागीदारीच्या करारातील अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीसी पाठवल्याचा राग मनात धरून जागृती डेव्हलपर्सच्या सुमारे १० ते १२ जणांनी अरुणभूमी कॉर्पोरेशनच्या कार्यालयाचा जबरदस्तीने कब्जा केला. तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरागावमधील एका जागेवर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या जागेचा सातबारा अरुणभूमी कॉर्पोरेशनच्या नावे असून त्यावरील बांधकामासाठी जागृती डेव्हलपर्सची उपबिल्डर म्हणून नियुक्ती केली आहे. जागृती डेव्हलपर्सचे किशोर शाह, रामआशीष गुप्ता, मदन गुप्ता, दुल्लाभाई बलदानिया हे भागीदार आहेत. यातील रामआशीष गुप्ता हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. तर, अरुणभूमी कॉर्पोरेशनचे मालक एन.के. जोशी हे आहेत. या दोन्ही बिल्डरांमध्ये त्या बांधकामांसाठी २००९ मध्ये भागीदारीचा करार होऊन तो २०११ मध्ये नोंदणीकृत केला. दरम्यान, जागृती डेव्हलपर्सने जागेवरील बांधकामाला २०१० मध्ये सुरुवात केली. तसेच करारातील अटीशर्तींनुसार बांधकामाच्या ठिकाणचे कार्यालय दोन्ही बिल्डरांकडून वापरले जात होते.
जागृती डेव्हलपर्सने २०१५ पासून बांधकाम बंद केले. तसेच कार्यालयात येणेही बंद केले. करारातील अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी अरुणभूमी कॉर्पोरेशनने करार रद्द केल्याची नोटीस जागृती डेव्हलपर्सला पाठवली. त्याला जागृती डेव्हलपर्सने उत्तर न दिल्याने अरुणभूमीमार्फत बांधकाम सुरू करण्यात आले. नोटीस पाठवूनही बांधकाम परस्पर सुरू केल्याचा राग मनात धरून जागृती डेव्हलपर्सच्या काही जणांनी अरुणभूमीच्या कार्यालयात जबरदस्ती कब्जा करण्याचा प्रयत्न केला.
कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करून सीसीटीव्हीची तोडफोड केली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.